Pakistan Assembly Shoes Robbery : संसदेतून खासदार आणि पत्रकार यांचे बूट गेले चोरीला !

पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे खासदार, पत्रकार आणि संसद कर्मचारी १९ एप्रिलला संसदेच्या संकुलातील मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गेले होते. लोक मशिदीतून बाहेर आले, तेव्हा त्यांचे बूट चोरीला गेले होते. चोरट्यांनी २० जोडे पळवून नेले. संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. नमाजपठणाच्या वेळी संसदेचे सुरक्षा अधिकारी त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. ‘सीसीटीव्ही फुटेज’वरून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

भिकारी माफियांनी चोरल्याची शक्यता ! – संरक्षणमंत्री

या घटनेविषयी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानमध्ये भिकार्‍यांची वाढती संख्या, ही चिंतेची गोष्ट आहे. त्यांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी एक मोहीमही चालू करण्यात आली आहे, ज्यामध्ये मोठे क्रिकेटपटूही भाग घेत आहेत. शहरात भिकारी दिसला की, पोलिसांना त्याची माहिती दिली जाते. पाकिस्तानमध्ये भीक मागणे, हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. अनुमाने १० टक्के लोकसंख्या या व्यवसायात गुंतलेली आहे. आम्ही भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. या भिकारी माफियांनीच बूट चोरल्याची शक्यता आहे.

कराचीचे साहाय्यक पोलीस महानिरीक्षक याकूब मिन्हास यांनी सांगितले होते की, हे भिकारी सिंध आणि बलुचिस्तान या  प्रांतांतून आले होते. त्यांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

ज्या देशांतील खासदारांचे बूट संसद परिसरातून चोरीला जाऊ शकतात, त्या देशाकडून जिहादी आतंकवाद्यांपासून अण्वस्त्रांचे रक्षण होऊ शकेल का ?