पुणे – ‘शिक्षणाचा अधिकार’ (आर्.टी.ई.) अंतर्गत महर्षीनगरमधील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता ५ वीतील ३० ते ३५ विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण (नापास) झाले. त्यानंतर फेरपरीक्षेसाठी २-३ दिवसांचे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर घेतले. त्यामध्ये काहीही न शिकवता पुन्हा परीक्षा घेतली. त्यातही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण (नापास) केले. शाळा व्यवस्थापन आता ‘मुलांचे ७० सहस्र रुपये शुल्क भरा; अन्यथा अन्य शाळेत पाल्याचा प्रवेश घ्या’, असे सांगत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रहित करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी नुकतेच पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
‘शिक्षणाचा अधिकार’ या अंतर्गत ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांना पहिलीला प्रवेश मिळाला. ते विद्यार्थी इयत्ता ४ थीपर्यंत चांगले शिक्षण घेत होते. प्रत्येक इयत्तेत उत्तीर्ण होत होते. परंतु आता इयत्ता ५ वीमध्येच कसा अनुत्तीर्ण होतात ?, असे प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केले. शाळा व्यवस्थापन हे जाणीवपूर्वक करीत असल्याचाही आरोप या वेळी पालकांनी केला.
‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापिका वैजयंता पाटील म्हणाल्या, ‘‘पुन्हा घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवले आहे. त्यात काही आर्.टी.ई. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ते अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे शुल्क शासन भरणार कि नाही याविषयी अध्यादेशात स्पष्टता नाही. एकाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला आम्ही शाळेतून काढले नाही किंवा पालकांनाही दाखले घेऊन जा, अशी सूचना केली नाही. शाळेचे शुल्क ७० सहस्र रुपये आहे, याची माहिती पालकांना दिली असली, तरी ती भरलीच पाहिजे, अशी सक्ती पालकांना केलेली नाही.’’