पिंपरी (पुणे) येथील ‘बलून पार्क’चे काम रखडले !

  • गेली ६ वर्षे काम बंद स्थितीत

  • आणलेले साहित्य वापराविना पडून !

पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेने चिंचवड लिंक रस्त्यावर ‘मदर तेरेसा उड्डाणपूल’ बांधलेला आहे. पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये अनधिकृत झोपड्या निर्माण होऊ नये, रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांची गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ‘बलून पार्क’ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारंभी ५० टक्के काम पूर्ण झाले; परंतु त्यानंतर अचानक काम बंद झाले. ते गेली ६ वर्षे काम अत्यंत मंदगतीने चालू असल्याने स्थानिक नागरिक अप्रसन्न आहेत.

‘बलून पार्क’च्या सजावटीसाठी आणलेल्या मोरांच्या प्रतिकृती गोणपाटांनी झाकून ठेवल्या आहेत. रंगरंगोटीसाठीचे साहित्य, लोखंडी सळई, जिन्याचे साहित्य हे सर्व तसेच पडून आहे. त्याचा वापर होत नसल्याने ते साहित्य खराब होत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

महापालिकेने पुढाकार घेऊन ‘बलून पार्क’चे काम चालू केले. उड्डाणपुलाच्या खांबांवर रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली. मोरांचे ‘वारली’ पद्धतीचे नक्षीकाम केले. मोकळ्या जागेत ‘पळण्याचा पट्टा’ (जॉगिंग ट्रॅक) बांधण्याचे काम चालू केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी समूह बैठक व्यवस्था, शोभीवंत झाडे लावण्याचे काम चालू होते. त्यानंतर हे काम बंद पडले आहे.

कार्यकारी अभियंता संध्या वाघ म्हणाल्या की, ‘बलून पार्क’चे काम कलात्मक असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने करावे लागते. प्रारंभी नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे २ वर्षांचा कालावधी गेल्याने काम रखडलेले आहे.