Judge Namaz Case : अधिवक्त्यांच्या नमाजपठणाला विरोध केल्यावरून जिल्हा न्यायाधिशाला उच्च न्यायालयाची मागावी लागली क्षमा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुसलमान अधिवक्ता महंमद इद्रिस यांच्या नमाजपठणावर टिप्पणी केल्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘एन्.आय.ए.’चे विशेष न्यायाधीश (अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश) विवेकानंद शरण त्रिपाठी यांना समन्स बजावले (न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याची सूचना देणे). यामुळे न्यायाधीश त्रिपाठी यांनी १५ एप्रिल या दिवशी उच्च न्यायालयासमोर विनाअट क्षमा मागितली. खरेतर न्यायाधीश त्रिपाठी यांना असे आढळून आले की, इद्रिस वारंवार नमाजपठणासाठी न्यायालयाबाहेर जात होते. त्यामुळे त्यांनी आरोपीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका न्यायमित्राची नियुक्ती केली होती.

१. न्यायाधीश त्रिपाठी यांच्या या निर्णयावर आक्षेप घेत महंमद इद्रिस यांनी अलाहाबाद उच्च न्यायालय गाठले.

२. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा धार्मिक आधारावर भेदभाव असल्याचे म्हटले. राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करणार्‍या कलम १५ चे हे हनन असून न्यायाधीश त्रिपाठी यांना समन्स पाठवले. यामुळे न्यायाधीश त्रिपाठी यांनी उच्च न्यायालयात जाऊन न्यायाधिशांसमोर विनाअट क्षमा मागितली.

३. सुनावणीच्या वेळी काही मुसलमान अधिवक्त्यांनी शुक्रवारच्या नमाजाला उपस्थित रहाण्यासाठी न्यायालयाला काही काळ स्थगित करण्याची विनंती केली होती. यावर न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी मुसलमान अधिवक्त्यांची ही प्रार्थना फेटाळून लावत आदेश दिला होता की, जेव्हाही मुसलमान अधिवक्ता नमाजासाठी जातील, तेव्हा न्यायमित्र हे आरोपीचे प्रतिनिधित्व करतील.