कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या कुटुंबियांची वंदनीय उपस्थिती !

रामनवमीनिमित्त आश्रमातील श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची पूजा

जुन्नर (पुणे), १७ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने १६ अन् १७ एप्रिल २०२४ या २ दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांसह कसरेकर कुटुंबीय आणि प.पू. रामानंद महाराजांचे कुटुंबीय यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प.पू. भक्तराज महाराजांचे भक्त या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प.पू. भक्तराज महाराजांच्या समाधीस्थळी आरती करतांना उपस्थित भक्त

१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते. १७ एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत प्रभु श्रीरामचंद्रास पवमान अभिषेक, तसेच प.पू. भक्तराज महाराजांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा आणि अभिषेक करण्यात आला. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेतह.भ.प. श्री मंगेश हिवरेकर (जिल्हा जालना) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीरामजन्माचा पाळणा म्हणून आरती करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.