नाशिक लोकसभा लढवण्यावर श्री शांतिगिरी महाराज ठाम !

८ दिवसांचे अनुष्ठान केले !

श्री शांतिगिरी महाराज

नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी त्यांनी ८ दिवसांचे अनुष्ठान केले. यानंतर त्यांची त्र्यंबकेश्वर शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. ‘पुष्कळ केले नेत्यांसाठी, आता लढू बाबांसाठी’ अशा आशयाचे फलक महाराजांच्या भक्तांच्या हातांत दिसून आले. श्री शांतिगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. ‘येथे आपल्याला उमेदवारी देण्यात यावी’, या मागणीसाठी श्री शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. महायुतीतील अनेक नेत्यांची भेट घेत श्री शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराने नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला होता; मात्र महायुतीच्या वतीने श्री शांतिगिरी महाराजांना ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे; मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची सिद्धता महायुतीमध्ये चालू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्री शांतिगिरी महाराजांनी आता अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.