कणकवली – तालुक्यातील वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या ‘आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ आणि ‘नवदिव्यांग फाऊंडेशन संस्थे’च्या सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘स्वमग्न’ (गतीमंद) मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘आयडियल स्पेशल स्कूल’ चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली.
कणकवली येथील ‘संजीवनी हॉस्पिटल’मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. तायशेटे बोलत होते. या वेळी डॉ. अनिल नेरूळकर, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. नीलेश महिंद्रेकर आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. तायशेटे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे लागत होते; मात्र आता जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात ‘स्वमग्न’ मुलांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने येत्या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा चालू करण्यात येणार आहे. या शाळेत ‘स्पेशल एज्युकेशन’, ‘रिमेडीयल एज्युकेशन’, ‘अर्ली इंटरव्हेंशन’, ‘आर्ट्स बेस्ट थेरपी’, ‘ऑक्युपेशनल थेरपी’, ‘स्पीच थेरपी’ यांसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.’’