इराणकडून इस्रायलवर ३०० ड्रोनद्वारे आक्रमण

इस्रायलने ९९ टक्के आक्रमण केले निष्फळ !

तेहरान (इराण) – इराणने १३ दिवसांनंतर इस्रायलवर मोठे आक्रमण केले आहे. इराणने १३ एप्रिलला  इस्रायलशी संबंधित नौका कह्यात घेतल्यानंतर १४ एप्रिलला पहाटे इस्रायलवर ३०० पेक्षा अधिक ड्रोनद्वारे आक्रमण केले. अमेरिकी सैन्याने काही ड्रोन पाडले, तर इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने) इराणने डागलेली रॉकेट्स रोखली. इस्रायलने १ एप्रिल या दिवशी सीरियामधील इराणच्या दूतावासावर आक्रमण केल्याचा सूड घेण्यास इराणने ड्रोनद्वारे आक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. इस्रायलच्या आक्रमणात इराणच्या २ सैन्याधिकारी आणि ‘रिव्हॉल्यूशनरी गार्डस’चे ५ कर्मचारी मारले गेले होते.

सौजन्य  The Sun

या आक्रमणानंतर इस्रायलने म्हटले आहे की, इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक राकेट्स डागले आणि त्यांपैकी ९९ टक्के रॉकेट्स रोखण्यात आले. इराण व्यतिरिक्त इराक आणि येमेन येथूनही काही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. यात इस्रायलची किती हानी झाली, हे समजू शकलेले नाही. या आक्रमणामुळे आता जगात युद्धाची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. यापूर्वी जगात रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात युद्ध चालूच आहे.

आणखी रक्तपात नको ! – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक

इराणच्या इस्रायलवरील आक्रमणानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. आपल्याच घरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे इराणने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ब्रिटन इस्रायल, जॉर्डन आणि इराक यांच्यासह आमच्या सर्व प्रादेशिक भागीदारांच्या सुरक्षेसाठी उभा राहील. परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि पुढील वाढ रोखण्यासाठी आम्ही तातडीने काम करत आहोत. आणखी रक्तपात कुणीही पाहू इच्छित नाही.

संयम बाळगा आणि हिंसाचारापासून मागे हटा ! – भारताचे आवाहन

रणधीर जयस्वाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर निवेदन सादर केले आहे. यात म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल आम्ही गंभीरपणे चिंता व्यक्त करत आहोत. या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. आम्ही संयम बाळगणे, हिंसाचारापासून मागे हटणे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन करतो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखणे अत्यावश्यक आहे.

भारताने प्रसारित केली होती सूचना !

इराण इस्रायलवर आक्रमण करणार, हे स्पष्ट झाल्यावर भारताने मार्गदर्शक सूचना जारी करून भारतियांना सतर्कतेची चेतावणी दिली होती. भारतियांनी इराण आणि इस्रायल यांसह म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. इस्रायल आणि इराण येथे रहाणार्‍या भारतियांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. सध्या इराण किंवा इस्रायल येथे रहाणार्‍या सर्वांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःच्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

इराणने कह्यात घेतलेल्या इस्रायली नौकेवर १७ भारतीय कर्मचारी !

इराणने एक इस्रायली मालवाहू नौका कह्यात घेतली. या नौकेवर एकूण २५ कर्मचारी होते. त्यांपैकी १७ भारतीय आहेत. या १७ कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला जात आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणारी इस्रायली नौका कह्यात घेतले आहे. ही नौका संयुक्त अरब अमिरातमधील बंदारावरून निघाली होती.