पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात पूर्वीच्या मंदिर समितीने केलेले बांधकाम प्राचीन बांधकामाशी विसंगत !

पुरातत्व विभागाकडून श्री विठ्ठलाच्या गर्भगृहात लावलेल्या टाइल्सही काढणार !

नामदेव पायरीवर आधुनिक पद्धतीने केलेले बांधकाम

पंढरपूर, १३ एप्रिल (वार्ता.) – संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात यापूर्वीच्या मंदिर समितीने केलेले बांधकाम मंदिराच्या प्राचीन बांधकामाशी विसंगत असल्याचा ठपका ‘तेजस्वीनी आफळे असोसिएट्स’ या स्थापत्य संवर्धन क्षेत्रात काम करणार्‍या खासगी आस्थापनाने ठेवला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या शिफारसीने या आस्थापनाने पंढरपूर देवस्थान मंदिराच्या विकासाचा अत्यंत अभ्यासपूर्ण आराखडा बनवला आहे. यामध्ये मंदिरातील अनेक कामांवर आक्षेप घेण्यात आला असून श्री विठ्ठलाच्या गर्भगृहात ‘ग्रॅनाईटच्या टाइल्स’ बसवणे हे मंदिराच्या पूर्वीच्या बांधकामाशी विसंगत असल्याचा ठपकाही यामध्ये ठेवण्यात आला आहे. मंदिराचे जतन आणि संवर्धन यांच्या अंतर्गत पुरातत्व विभागाकडून हे आक्षेपार्ह बांधकाम तोडण्याची कार्यवाही सध्या चालू आहे. ‘धर्मशास्त्राचे जाणकार आणि पुरातत्व विभाग यांचे मार्गदर्शन न घेता, तसेच भाविकांना विश्‍वासात न घेता श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराच्या बांधकामात मूळात छेडछाड का करण्यात आली ? असे करणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार ?’, असे प्रश्‍न भाविकांनी उपस्थित केले आहेत.

सद्यःस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती आणि जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरासह मंदिराच्या परिसरातील ३८ परिवार देवता आणि मंदिर परिसराच्या बाहेर असलेल्या परिवार देवतांची २८ मंदिरे यांच्या जतन-संवर्धनाचे काम चालू आहे. यामध्ये मंदिरांचे जतन-संवर्धन आणि मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा या २ भागांमध्ये हे काम होणार आहे. यामध्ये मंदिरांच्या जतन आणि संवर्धनासाठी ३५ कोटी ४२ लाख रुपये, तर व्यवस्थापन अन् भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी १८ कोटी १० लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

शिलालेखाच्या दगडांवर टाइल्स बसवल्याचा धक्कादायक प्रकार !

श्री विठ्ठलाच्या मूर्तीपुढील विठ्ठल सभागृहात काळ्या पाषाणावर बसवण्यात आलेल्या टाइल्स काढल्यावर त्याखाली असलेले काळे पाषाण दिसत आहेत.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर असलेल्या श्री विठ्ठल सभागृहात शिलालेख असलेले दगड होते. हे दगड बळकट आणि टिकावू असूनही पूर्वीच्या मंदिर समितीने त्या दगडावर टाइल्स बसवल्या. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने या टाइल्स काढल्यानंतरही आतील पूर्वीचे दगडाचे काम अद्यापही बळकट आहे. हे दगड कायम ठेवून चुना, गुळ आदींच्या नैसर्गिक मिश्रणाने दगडांमधील भेगा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुरातन बांधकामाचा टिकावूपणा वाढणार आहे.

पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात पूर्वीच्या मंदिर समितीने केले प्राचीन वास्तूशी विसंगत बांधकाम !

ठपका ठेवण्यात आलेली मंदिरातील अन्य कामे !

‘तेजस्वीनी आफळे असोसिएट्स’ आस्थापनाने बनवलेल्या विकास आराखड्यामध्ये खालील आक्षेप मांडले असून या सर्वांमध्ये पुरातत्व विभागाकडून आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार आहे.

१. मंदिरातील विद्युतीकरणासाठी करण्यात आलेल्या जोडण्या अनियोजित आणि मंदिराच्या बांधकामाला हानीकारक आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या वरच्या भागातून बाहेर काढण्यात आलेल्या विद्युततारा उघड्या आहेत. दर्शन बारीच्या ठिकाणी विद्युततारांचे अस्ताव्यस्त जाळे आहे.

२. रुक्मिणी मंदिरामध्ये दानपेटी आणि संरक्षक कठडा इतका उंच आहे की, त्यामुळे भाविकांना श्री रुक्मिणीदेवीचे दर्शन घेणे अवघड होत आहे.

३. श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना अर्पण होणार्‍या वस्त्रांचा साठा मंदिरातीलच एका भागात करण्यात आला आहे. मंदिरामध्ये कोणती आगीची दुर्घटना घडल्यास ते धोकादायक ठरणारे आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने घटनास्थळी जाऊन प्रकार उघड केला ! 

सरकारने खासगीकरणार्‍या नावाखाली हे मंदिर कह्यात घेतले असून मंदिराच्या व्यवस्थापनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना केली आहे. स्थानिक स्तरावर मंदिर समितीच्या कारभारावर नियंत्रण ठेवले जाते. असे असले, तरी मुळात हे मंदिर समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. श्री विठ्ठलाचे मंदिर हे मध्ययुगीन काळातले असून भारतियांचे वैभव आहे. त्यामुळे पूर्वीच्या मंदिर समितीने मंदिरांच्या बांधकामामध्ये पालट करतांना तज्ञ आणि हिंदु धर्मशास्त्राचे जाणकार यांचा सल्ला घेणे, तसेच वारकरी यांना विश्‍वासात घेणे आवश्यक होते; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे हा गंभीर प्रकार समस्त वारकरी आणि हिंदु धर्मशास्त्राचे जाणकार यांपर्यंत पोचावा, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष विकास आराखडा समजून घेऊन, पुरातत्व विभागाद्वारे चालू असलेल्या कामांची पहाणी करून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांकडून माहिती घेतली.

वारकर्‍यांसह समस्त हिंदूना आवाहन ! 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने श्री विठ्ठल मंदिरातील अशास्त्रीय बांधकाम तोडून मंदिराचे प्राचीनत्व कायम राखण्यासाठी चालू असलेली कार्यवाही अभिनंदनीय आहे; मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि महाराष्ट्रसह भारतभूमीचे भूषण असलेल्या श्री विठ्ठलाच्या मंदिरात ज्यांनी अशास्त्रीयरित्या बांधकाम केले, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठीही या सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे होत नसेल, तर वारकर्‍यांसह समस्त हिंदु समाजाने यासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे. आपल्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांमध्ये कोणता अयोग्य प्रकार होऊ नये, यासाठी सतर्क राहून तो रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हेही एक भाविक म्हणून आपले कर्तव्य आहे. – संपादक

जतन आणि संवर्धन यांमुळे मंदिराची प्राचीनता टिकून रहाणार !

पूर्वीच्या मंदिर समितीने मंदिरांमध्ये आधुनिक पद्धतीने काम केले असले, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिर समितीच्या पुढाकाराने मंदिरातील अशास्त्रीय बांधकाम हटवून मंदिराचे शास्त्रीय पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. हे सर्व काम शास्त्रीय पद्धतीने होणार असून यामुळे मंदिराची प्राचीनता टिकून रहाणार आहे. या कामाचा अभ्यासपूर्ण आराखडा बनवण्यात आला असून त्यावरील कार्यवाहीसाठी पुरातत्व विभागाचे साहाय्यही घेण्यात येत आहे. विविध दिड्यांचे प्रतिनिधी, अभ्यासक यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांनी सुचवलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींना बुलेट प्रूफ काचेचे संरक्षककवच, सी.सी.टी.व्ही.च्या नियंत्रणाखाली काम करणे, भाविकांना काही काळ मुखदर्शनाची सुविधा, मंदिराच्या बाहेर  स्क्रीनद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दर्शन आदी कार्यवाही करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले. प्रत्यक्षात मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार वाढला आहे. मंदिरे ही राजकारण्यांचे बस्तान बसवण्याचे अड्डे झाले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असावे, यासाठी समस्त हिंदू समाजानेच पुढाकार घ्यायला हवा !
  • सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांतील या अनागोंदी कारभारला उत्तरदायी कोण ?