Delhi LG On Namaz : देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नमाजपठण झाले नाही !  

देहलीच्या नायब राज्यपालांचा दावा !

देहलीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना (वर्तुळात)

नवी देहली – देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यांवर नव्हे, तर मशिदींमध्ये नमाजपठण करण्यात आले आहे. हे हिंदु आणि मुसलमान यांच्यातील सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे. यावरून अनेक सूत्रे परस्पर चर्चेतून सोडवली जाऊ शकतात, हे सिद्ध होते. मी देहलीतील सर्व मशिदी आणि ईदगाह (नमाजपठणासाठी ठेवलेली मोकळी जागा) यांच्या इमामांचे (इस्लामच्या अभ्यासकांचे) आभार मानतो, अशी प्रतिक्रिया देहलीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली आहे.

नायब राज्यपाल सक्सेना पुढे म्हणाले की, यासंदर्भात ४ एप्रिलला देहलीच्या सर्व इमामांसमवेत बैठक घेण्यात आली होती. या वेळी वाहतुकीस अडथळा होऊन सामान्य जनतेला त्रास होऊ नये, यासाठी मशिदीच्या आवारात नमाजपठण करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. या विनंतीला मान देऊन त्यांनी मशिदीच्या आवारात नमाजपठण केले. विशेष म्हणजे या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

संपादकीय भूमिका

जर असे झाले असेल, तर ही चांगली गोष्ट आहे. आता यापुढे जाऊन हिंदूंच्या सणांच्या वेळी निघणार्‍या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींजवळ आक्रमण होणार नाही, यासाठीही केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !