Karachi Beggars : ईदच्या निमित्ताने भीक मागण्याचा व्यवसाय करणार्‍या ४ लाख लोकांचा कराचीत महापूर !

रमझान महिन्यात एकट्या कराचीतील गुन्ह्यांची स्थिती !

१.  १९ जणांची हत्या

२.  ६ सहस्र ७८० गुन्हेगारी घटना

३.  १३० हून अधिक वाहनांची चोरी !

कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये ईद साजरी होत असतांना अचानक त्याची आर्थिक राजधानी असणार्‍या कराचीमध्ये भिकार्‍यांचा महापूर आला आहे. जवळपास ४ लाख लोकांचा भीक मागणे हा व्यवसाय असून ते सर्व वयोगटातील आहेत. ते कराचीच्या बाजारपेठा, मुख्य रस्ते, ट्रॅफिक सिग्नल्स, शॉपिंग मॉल्स आणि मशिदी येथे जमले आहेत. पाकमध्ये इंधन आणि खाद्यपदार्थ यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गगनाला भिडणार्‍या महागाईने पाकसाठी मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. रमझान महिन्यात रस्त्यावरील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाला, तर जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ५५ लोकांनी लूटमारीला विरोध केल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. ‘जिओ न्यूज’नुसार रमझान महिन्यात कराचीमध्ये ६ सहस्र ७८० गुन्हेगारी घटना घडल्या. या काळात १३० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत.

१. ‘न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राने कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रमझान महिन्यात अनुमाने ३ ते ४ लाख व्यावसायिक भिकारी ईदच्या निमित्ताने पैसे कमावण्यासाठी कराचीत येतात. ते कराचीला मोठी बाजारपेठ म्हणून पहातात. कराचीत येऊन हे लोक गुन्हे करतात. ते सिंध, बलुचिस्तान आणि देशाच्या इतर प्रांतांतून येतात.

२. एवढेच नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियात यात्रेकरू म्हणून गेलेल्या अनेक पाकिस्तानी भिकार्‍यांना विमानातून पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आले होते.

३. पाकिस्तानातील भिकारी तीर्थयात्रेच्या नावाखाली आखाती देशांमध्ये जातात. ते सौदीतील मक्का-मदीना या मुसलमानांच्या पवित्र ठिकाणी जाऊन भीक मागतात.

४. पाकिस्तानच्या विदेशी प्रकरणांचे सचिव झीशान खानजादा यांनी सांगितले की, मक्का मशिदीतून अटक करण्यात आलेले बहुतांश पाकिटमार हे पाकिस्तानी नागरिक आहेत.

संपादकीय भूमिका

रमझान महिन्यात अल्लाची अधिकाधिक उपासना करण्याचा संदेश देणार्‍या इस्लामी पाकिस्तानात असे चित्र कसे ? यातून इस्लाम भारतात नाही, तर पाकिस्तानात ‘खतरे में है’, असे म्हणण्याची नामुष्की पाकवर आली आहे !