आयुष मंत्रालयाच्या वतीने पुणे येथे योग महोत्सवाचे आयोजन !

 

पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिवसाला काही अवधी शेष असतांना या सोहळ्यानिमित्त पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रतिसाद दिला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी नाशिक येथील ‘योग विद्या गुरुकुल’चे अध्यक्ष विश्वास मंडलिक, आयुष मंत्रालयाच्या संचालक विजयालक्ष्मी भारद्वाज, राष्ट्रीय निसर्ग विचार संस्थेच्या संचालक डॉ. सत्यलक्ष्मी आणि वैद्य डॉ. काशिनाथ समांगडी उपस्थित होते.

‘निरोगी आणि चांगल्या भविष्यासाठी योग साधना ही जागतिक चळवळ आहे’, असे आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल यांनी सांगितले.

‘योग साधना ही भारताच्या समृद्ध वारशाची देणगी आहे. योग म्हणजे आध्यात्मिक शिस्तबद्धता असून जी शरीर आणि मन यांमध्ये सुसंवाद निर्माण करणार्‍या सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे’, असे मत मंडलिक यांनी व्यक्त केले.