लातूर – दुबई, मस्कत येथून भारतात मतदान करण्यासाठी विमाने भरभरून येतात; परंतु गल्लीत रहाणारी शहाणी, सुशिक्षित माणसे मतदान करत नाहीत. मतदान हा जसा अधिकार आहे, तसेच ते पवित्र कर्तव्य आहे. त्यामुळे देश, धर्म आणि महाराष्ट्र यांच्या कल्याणासाठी सर्वांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीला जागृत करण्यासाठी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी ‘शिवचेतना फेरी’ काढली आहे. त्या निमित्ताने संतसंदेश सभेच्या आयोजनाच्या प्रसंगी ते बोलत होते. याचे आयोजन ‘भारत विकास परिषदे’ने केले आहे.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणाले, ‘‘त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जशी आव्हाने उभी होती, तशीच आव्हाने आताही आहेत. मी कोणत्या एका पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा, असे सांगत नाही; परंतु जो हिंदु संस्कृती, सनातन धर्म, गोरक्षण यांच्या संरक्षणासाठी काम करतो, त्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे, ही काळाची आवश्यकता आहे. पालघरमध्ये झालेली २ साधूंची हत्या आजही स्मरणात कायम आहे. या साधूंना पोलिसांनीच मारेकर्यांच्या कह्यात दिले, हे विसरता येणार नाही.’’
सर्वसामान्य खेड्यात रहाणारा माणूस मतदान केल्याविना रहात नाही; पण श्रीमंत, सुशिक्षित लोक मात्र मतदानाच्या दिवशी सहलीला जातात. असे न करता प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.’’ – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि |