कोल्हापूर – छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करणे, भुयारी गटारीची कामे, तसेच सर्व इमारतींतील अंतर्बाह्य सुशोभीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार आहेत. या कालावधीत रुग्ण, तसेच संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ. एस्.एस्. मोरे यांनी केले आहे. या दुरुस्तीच्या कामाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन केले आहे. बाह्यरुग्ण विभागातील काही विभाग इतरत्र स्थलांतरित करून तेथील कामे केली जातील. त्याचप्रमाणे आंतररुग्ण विभागातील रुग्ण इतर कक्षात किंवा अतीदक्षता विभागात स्थलांतरित करून उपचार केले जातील.