(टीप : ‘अतिथीदेवो भव’ (तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षा, अनुवाक ११, वाक्य २), म्हणजे अतिथीला (पाहुण्याला) देवासमान मानावे.)
स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या एका जोडप्याने भारतात त्यांना आलेला गंभीर अनुभव सामाजिक माध्यमांमधून जगभर पोचवला. या जोडप्यातील महिलेने तिच्यावर ७ भारतियांनी सामूहिक दुष्कर्म आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप खरा आहे कि नाही ? यात कोण सामील आहे ? हे येणार्या काळात सिद्ध होईलच; पण जर हे खरे असेल, तर समस्त भारतियांसाठी हे लज्जास्पद आहे.
१. महिलांविषयी होणार्या गुन्ह्यांमुळे देशाची होणारी सर्व प्रकारची हानी
मुळात महिलांशी संबंधित असा गुन्हा होणे, हे गंभीरच आहे; पण परदेशी महिलेशी असे कृत्य होणे, हे आणखी गंभीर आहे आणि यात देशाची प्रतिमा मलीन होते. या महिलेने तिचे आरोप सामाजिक माध्यमांद्वारे जगभर पोचवले आहेत. आता जगभरातून भारतात येणारे पर्यटक भारतात येण्यापूर्वी दोनदा विचार करतील. याचा परिणाम भारताला मिळणार्या परकीय चलनावर होतो. परदेशी पर्यटक येणे न्यून झाले, तर उपाहारगृहे, रिक्शा, रेल्वे आणि विमान सेवा अशा अनेक माध्यमांतून मिळणारा रोजगार बाधित होतो. केवळ एवढीच हानी होत नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे विविध देशांशी जे राजकीय सबंध आहेत, ते अशा घटनांमुळे बिघडू शकतात. राजनैतिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी भारताचे परदेशातील राजदूत, तेथील कर्मचारी, देशाचे परराष्ट्रीय मंत्रालय आणि स्वतः पंतप्रधान कार्यालय अहोरात्र झटत असतात. परदेशातील भारतीय नागरिकांना हव्या त्या सोयीसुविधा, दोन देशांतील व्यापाराचे नियम आणि अनेक इतर गोष्टी आपल्याला सोयीस्कर अटींवर मिळवून घेण्यासाठी हे सर्व अधिकारी कूटनीतीचा कस पणाला लावत असतात. अशा वेळी या घटना भारताची सौदेबाजीची शक्ती (बारगेनिंग पॉवर) न्यून करतात.
२. नैतिक मूल्य शिकवण्याची नितांत आवश्यकता दर्शवणारी घटना
‘अतिथीदेवो भव’ हे सूत्र जपणार्या भारतासारख्या देशात परदेशी महिलेसमवेत असे कृत्य घडणे, हे खरच लांच्छनास्पद आहे. मूल्य शिक्षणाची किती आवश्यकता आहे ? हे या निमित्ताने अधोरेखित होते. परदेशी प्रवासी भारतात फिरतांना त्यांच्या संस्कृतीनुसार आणि भारतातील उष्ण कटिबंधीय वातावरणामुळे त्यांना सोयीच्या पेहरावात रहातात. अशा वेळी त्यांच्याकडे बघत रहाणे, त्यांना संकोच वाटेल अशी कृत्ये करणे, त्यांच्या गोर्या त्वचेचे अप्रूप वाटून घेणे, त्यांना न विचारता त्यांची छायाचित्रे काढणे, त्यांच्या समवेत छायाचित्रे काढण्याचा आग्रह करणे, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आपल्याकडून होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक भारतियाने घ्यायला हवी. त्यांच्या देशात परत गेल्यावर त्यांनी भारतीय आणि भारताची कुठल्या गोष्टींसाठी आठवण काढावी ? किंवा कुठल्या गोष्टींची आठवण काढू नये ? हे आपल्या वर्तनावरच अवलंबून आहे.
३. देशाची प्रतिमा सांभाळणे आणि उंचावणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य !
तात्पुरता वैयक्तिक लाभ किंवा अवैध सुख मिळवण्याची लालसा यांमुळे देशाची होणारी दूरगामी हानी सर्व समाजाला भोगावी लागते. देशाच्या अब्रूची अशी हानी हा अक्षम्य गुन्हा आहे. जगात भारताची प्रतिमा मलिन व्हावी; म्हणून देशांतर्गत आणि विदेशात देशविरोधकांच्या अनेक प्रणाली कार्यरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जगात देशाची प्रतिमा सांभाळणे आणि उंचावणे, हे केवळ राजनैतिक अधिकार्यांचे उत्तरदायित्व नसून प्रत्येक भारतियाचे आहे. आपल्या देशात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना सामोरे जातांना आपण आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहोत, याचे भान प्रत्येक भारतियाने ठेवले पाहिजे.
– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (३.३.२०२४)