माले – मालदीवचे चीन समर्थक राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी मालदीवला इस्लामी देश बनवण्याचे षड्यंत्र रचले आहे. मुइज्जू स्वतःला इस्लामचे संरक्षक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षात असतांना त्यांना या रणनीतीचा लाभ झाला होता. २४ एप्रिल या दिवशी मालदीवमध्ये होणार्या संसदीय निवडणुकांसाठी राष्ट्रपती मुइज्जू यांनी इस्लामच्या सूत्रावरून मतदारांना चुचकारणे चालू केले आहे. त्यांनी इस्लामचे काटेकोरपणे पालन न करणार्यांविरुद्ध कारवाईही तीव्र केली आहे. पोलिसांनी रमजानच्या काळात रोजाचा उपवास मध्येच सोडणार्या १२ जणांना अटक केली आहे. यांतील ९ जणांना माले, तर तिघांना एटोल येथून अटक करण्यात आली. त्यांनी मालदीवमध्ये नाताळ साजरा करण्यावर बंदी घातली आहे, तर योग कार्यक्रमांना गैरइस्लामी म्हटले आहे.
मुइज्जू तुर्कीएच्या वाटेवर !
तज्ञांच्या मते, मालदीवने इस्लामीकरणाला चालना दिल्यास पुढील काही वर्षांत देशासाठी घातक परिणाम दिसून येतील. मालदीव इस्लामी देशांकडे अधिकाधिक झुकत आहे. मुइज्जू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिला विदेश दौरा तुर्कीएला केला होता. तुर्कीए मालदीवचा एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून उदयास आला आहे.
‘एम्.डी.पी.’चे कडवे आव्हान !
मुइज्जू यांना संसदीय निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या पक्षाला संसदेत बहुमत मिळाले नाही, तर ते त्यांची धोरणे राबवण्यात अपयशी ठरतील. त्यांना माजी राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलिह यांच्या ‘एम्.डी.पी.’ पक्षाचे कडवे आव्हान आहे.
संपादकीय भूमिकामुइज्जू यांना मालदीवचे इस्लामीकरण करायचे आहे; मात्र मुसलमानांवर अत्याचार करणार्या चीनचे मात्र तो समर्थन करतो, हे कसे ? यातून मुइज्जू यांचा दुटप्पीपणा दिसून येतो ! |