छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये घट होत असून जवळपास ५१ तालुक्यांवर भीषण जलसंकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात सद्यःस्थितीला टँकरची संख्या १ सहस्रपर्यंत पोचली आहे, तर यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील ७६ पैकी ५१ तालुक्यांत भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक २.२८ मीटर भूजल पातळी परभणी, तर त्या खालोखाल २.१३ मीटर लातूर जिल्ह्यामध्ये घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मराठवाड्यातील ८७५ विहिरींची पाणीपातळी पडताळली आहे. मराठवाड्यात १ मासानंतर पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याचे चिन्हे आहेत.
मराठवाड्यात एकूण ८०९ गाव-वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा !
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागात पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यांत आजघडीला तब्बल १ सहस्र टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मराठवाड्यातील ६३९ गावे आणि १७० वाड्या यांवर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ज्यात १३ शासकीय आणि ९०० हून अधिक खासगी टँकरचा समावेश आहे.