Ohio Indian Student Death:ओहायो (अमेरिका) येथे अपहरण झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

भारतात असलेल्या वडिलांकडे १ लाख रुपयांची मागितली होती खंडणी, पैसे न दिल्यास मुलाचे मूत्रपिंड विकण्याची दिली होती धमकी !

कोलंबस (अमेरिका) – अमेरिकेतील ओहायो राज्यात असलेल्या क्लीव्हलँड येथे महंमद अब्दुल अरफत नावच्या २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तो मूळचा भाग्यनगर येथील असून गेल्या ३ आठवड्यांपासून तो बेपत्ता होता. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार अब्दुलचे अमली पदार्थ विक्रेत्यांनी अपहरण केले होते. भारतात रहाणार्‍या त्याच्या वडिलांकडेही अपहरणकर्त्यांनी अनुमाने एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ‘पैसे मिळाले नाहीत किंवा पोलिसांना कळवले, तर अब्दुलचे मूत्रपिंड विकू’, अशी धमकीही त्यांना देण्यात आली होती. गेल्या काही कालावधीत अमेरिकेत भारतियांना ठार मारण्याची ही ११ वी घटना आहे.

अमेरिकेतील भारतीय दूतावासाने या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले असून ‘दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत आहोत. अब्दुलच्या मृत्यूच्या प्रकरणाची आम्ही अधिकार्‍यांसह चौकशी करत आहोत. त्यांचे पार्थिव लवकरच भारतात पाठवण्यात येणार आहे’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिका भारतियांसाठी अधिकाधिक धोकादायक होत चालले आहे. यावरून भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !