दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढावा ! – अमेरिका

पाकमध्ये भारताच्या शत्रूंच्या होणार्‍या हत्यांचे प्रकरण

मॅथ्यू मिलर

वॉशिंग्टन (अमेरिका) – अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू परदेशी भूमीवर मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्येही भारताच्या शत्रूंच्या हत्या झाल्या आहेत. पाकिस्तानने भारतावर हा आरोप केला आहे; मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता अमेरिकेने याबाबत निवेदन प्रसारित करून दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना पाकिस्तानच्या आरोपांबाबत पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला. यावर मॅथ्यू मिलर म्हणाले की, आम्ही या प्रकरणावरील बातम्यांवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही आरोपांवर भाष्य करणार नाही. आम्ही या प्रकरणात अडकू इच्छित नाही; परंतु आम्ही दोन्ही बाजूंना चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करतो.

सौजन्य : The Economic Times

ब्रिटीश माध्यमांच्या काही वृत्तांत पाकिस्तानचे आरोप प्रसिद्ध झाले आहेत; मात्र भारताने हे वृत्त दिशाभूल करणारे आणि खोटा प्रचार असल्याचे म्हटले आहे. या अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे, ‘भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ने परदेशातील असणार्‍या भारताच्या शत्रूंना लक्ष्य केले. वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर अशा २० घटना घडल्या आहेत ज्यात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी परदेशी भूमीवर भारताच्या शत्रूंना लक्ष्य केले.’ पाकिस्तानचे आरोप भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नुकतेच फेटाळले आहेत.