‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी श्री. योगेश जलतारे यांची नियुक्ती !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी श्री. योगेश वामनराव जलतारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जलतारे यांनी वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेस आरंभ केला असून वर्ष २००० पासून ते पूर्णकालीन साधक म्हणून कार्यरत आहेत.

‘सनातन प्रभात’च्या मुख्य कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे दायित्व त्यांनी काही काळ सांभाळले.

श्री. योगेश जलतारे

२६ वर्षांच्या साधनाकाळात श्री. जलतारे यांनी विविध सेवांचे दायित्व घेऊन सनातन प्रभात, तसेच धर्मप्रसाराच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. पूर्णकालीन साधक झाल्यानंतर त्यांनी आरंभी ठाणे येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संस्थास्तरीय लेखा विभागात सेवा केली. दैनिकात सेवेत असतांना त्यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’साठी विविध समाजोपयोगी आणि कायदेविषयक लेखांचे संकलन केले. तसेच ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य असलेल्या सूक्ष्म-जगतातील घटनांचे वार्तांकन, तसेच साधनाविषयक लिखाण केले.

मागील काही वर्षांपासून ते ‘सनातन प्रभात’साठी राष्ट्र-धर्म प्रबोधनपर लघुपटांच्या निर्मितीची सेवा करत आहेत. ‘आतापर्यंत छपाई तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’ समूहातील नियतकालिके समाजापर्यंत पोचवली जात होती. आता ती विविध सामाजिक माध्यमांद्वारे समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नरत राहू’, असा मनोदय संपादक म्हणून दायित्व स्वीकारतांना श्री. योगेश जलतारे यांनी व्यक्त केला.

सनातन परिवार, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री. जलतारे यांच्या नियुक्तीचे सहर्ष स्वागत केले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत !