गुढीपाडव्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश
‘गुढीपाडवा अर्थात् युगादी तिथी, म्हणजे हिंदूंचा नूतन वर्षारंभदिन ! हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला (श्रीरामाची बालक रूपातील मूर्ती) विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची ! प्रभु श्रीरामाने सकल जनांचे कल्याण करणारे आदर्श रामराज्य स्थापन केले. रामराज्य म्हणजे अध्यात्मपरायण (सात्त्विक) लोकांचे आदर्श राज्य ! सध्याच्या भ्रष्ट लोकशाहीत रामराज्याची कल्पना दुर्लभ झाली आहे; परंतु सध्याचा काळ हा संक्रमण काळ असल्याने याच काळात रामराज्याच्या स्थापनेचा प्रारंभ करणे सुलभ आहे. राष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आधी जनतेला स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी स्वतः साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल. सामाजिक जीवनात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांना विरोध करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल. सात्त्विक समाजाच्या पुढाकारातूनच अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना, म्हणजेच रामराज्य शक्य आहे; म्हणूनच या गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्याचा संकल्प करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले