Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

नवी देहली – देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यावर्षी एप्रिल ते जून या काळात देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक रहाणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या ४ ते ८ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १०-२० दिवस टिकू शकते.

हवामान खात्यानुसार जर कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोचले, तर त्या वेळी वहाणार्‍या वार्‍यांना उष्णतेची लाट मानले जाते. सर्वसाधारण शब्दात उन्हाळ्यात उत्तर-पूर्व किंवा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वहाणारे तीव्र उष्णता आणि कोरडे वारे यांना ‘उष्णतेच्या लाटा’ म्हणतात.

उष्णतेच्या लाटांवरून केंद्र सरकारकडून जनतेला सल्ला

१. शाळांमध्ये उघड्यावरील वर्गांवर बंदी घालण्यात यावी.

२. दुपारी १२ ते ४ या वेळेत बसगाड्या चालवू नयेत.

३. स्थलांतरित लोकांसाठी रात्रीचे निवारे दिवसभर उघडे ठेवावेत.

४. पाण्याचा अनावश्यक वापर थांबवावा.

५. पाण्याच्या टाक्यांमधून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जाईल, याची खात्री करावी.

६. दिवसभरात ठराविक अंतराने पुरेसे पाणी प्या. शरिरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

७. उष्माघातामुळे आजारी वाटत असल्यास, जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घ्या.