स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व

एकदा दुपारी जेवण झाल्यावर झोपत असतांना मला ‘एके ठिकाणी २० – २५ मुंग्या आल्या आहेत’, असे दिसले. तोपर्यंत मला त्या खोलीत मुंग्या दिसल्या नव्हत्या. त्यांना पाहून मला वाटले, ‘तेथे पडलेला तो कण खाऊन त्या मुंग्या निघून जातील’, असा विचार करून मी झोपले. एका तासानंतर जाग आल्यावर मला दिसले, ‘त्या कणाला लागलेल्या मुंग्या तशाच होत्या; पण खोलीत सगळीकडेही मुंग्या पसरल्या आहेत. माझ्या एका बॅगेत ठेवलेल्या खाऊला, दुसर्‍या बॅगेला बाहेरून आणि कचर्‍याच्या बालदीत असलेल्या कचर्‍यालाही मुंग्या लागल्या होत्या.’ ते पाहून मी त्रस्त झाले. ते सर्व स्वच्छ करतांना देवाने मला माझ्या स्वभावदोषांचे एकेक पैलू उलगडून दाखवले.

कु. रूपाली कुलकर्णी

१. देवाने उलगडून दाखवलेले स्वभावदोष आणि त्याचे जीवनावर होणारे परिणाम

अ. बर्‍याच वेळा मला सारणी लिहिण्याचा कंटाळा येतो. झोपतांना माझ्या मनात विचार येतो, ‘उद्या लिहूया.’ मला वाटले होते, ‘त्या २० – २५ मुंग्या आहेत’; पण उठल्यावर पाहिले, तर त्या असंख्य होत्या.

आ. मला सगळीकडे पसरलेल्या मुंग्या दिसल्या. तेव्हा माझ्यात अंतर्मुखता नसल्याने माझ्या मनातील नकारात्मकता सगळीकडे पसरते, म्हणजेच जीवनातील प्रत्येक प्रसंगावर त्याचा परिणाम होतो; पण मला ते कळत नाही.

मला दिसणारा किंवा मला जाणवलेला नकारात्मक विचार किंवा एखाद्याविषयीची प्रतिक्रिया एखादी असते’; पण त्याचे निर्मूलन वेळीच न केल्याने त्याची संख्या वाढते. तो माझा स्वभावदोष आणखी दृढ होतो. तो विचार एखादा नसतो, तर त्याच्या मागे असंख्य विचार आलेले असतात; पण त्या क्षणी मला ते जाणवलेले किंवा दिसलेले नसतात.

इ. ते सर्व स्वच्छ करायला मला जवळजवळ एक तास लागला; पण ज्या वेळी मला प्रथम त्या मुंग्या दिसल्या, त्याच वेळी मी ते स्वच्छ केले असते, तर त्यासाठी ५ मिनिटेही लागली नसती.

असेच माझ्या आयुष्यात आहे. प्रत्येक कृती वेळोवेळी न केल्याने मला त्याचा पुष्कळ त्रास होतो.

ई. सर्व स्वच्छता करूनही म्हणजे झाडणे, पुसणे केल्यानंतरही काही वेळाने मला खोलीत मुंग्या फिरतांना दिसल्या. त्या कदाचित् अन्नाचा शोध घेत असाव्यात. त्या मुंग्यांना मारण्यासाठी मुंग्याचा खडू ओढावा लागेल किंवा पदार्थ पाण्यात ठेवावे लागले. त्याप्रमाणेच ‘मलाही एखाद्या दिवशी मी प्रक्रिया राबवली, म्हणजे झाले’, असे नसून मला नियमितपणे स्वतःकडे लक्ष ठेवायला हवे.

परात्पर गुरुदेव, माझ्याकडून नियमितपणे स्वभावदोष प्रक्रिया राबवली जात नाही. मला तिचा कंटाळा येतो किंवा एखाद्या प्रसंगात माझ्या स्वभावदोषाची तीव्रता अधिक असेल, तरच मला खंत वाटते. प्रत्येक वेळी चूक झाल्यावर मला खंत वाटत नाही. ‘एखाद्या प्रसंगात चुकले. पुढच्या वेळी सुधारूया’, एवढाच विचार करून मी तो प्रसंग सोडून देते; पण आपण किती दयाळू आहात. प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून मी हा प्रसंग लिहून दिला आहे. प्रत्येक प्रसंगात मला तुम्ही शिकवत असता; पण तरीही मी अपराधी आहे. आपणच मला शिकवा. मला घडवा. मला माझ्या मनाविरुद्ध जाऊन तुम्ही सांगत असलेले प्रयत्न करवून घ्या आणि सदैव तुमच्या चरणांशी ठेवा’, अशी प्रार्थना करते.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.