एन्.सी.ई.आर्.टी.च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात पालट
नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन सविस्तरपणे शिकवले जाणार आहे. यासह ‘सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आधारावर श्रीराममंदिराच्या संदर्भातील निर्णय दिला ?’, हेही शिकवले जाणार आहे. इयत्ता ११ वीच्या राज्यशास्त्राच्याही पुस्तकात पालट करण्यात आले आहेत. हे पालट मे महिन्यापासून प्रकाशित होणार्या नवीन पुस्तकात दिसणार आहेत. हे पालट वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात् ‘सी.बी.एस्.ई.’ बोर्डाला याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
काय आहेत पालट ?
१. ११ वीच्या पुस्तकात ८ व्या धड्यामध्ये वर्ष २००२ च्या गोध्रा दंगलीत १ सहस्रांहून अधिक नागरिक, प्रामुख्याने मुसलमान मारले गेले, असा उल्लेख होता. यात पालट करून ‘या दंगलींमध्ये १ सहस्रांहून अधिक नागरिक मारले गेले’, असा उल्लेख करण्यात आला आहे.
२. पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तान ‘आझाद काश्मीर’ असे म्हणतो, असे या पुस्तकात म्हटले होते. त्यात पालट करून आता ‘हा भारतीय भूभाग पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला असून त्याला पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असे नाव दिले आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली. आता मुलांना सत्य इतिहास शिकवण्यासह आतापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण करणार्यांवर कारवाई होणेही राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे ! |