पदवी परीक्षेत हिंदी विषयाच्या २ पॅटर्न पेपरला दिल्या समान प्रश्नपत्रिका !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील अपप्रकार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ

छत्रपती संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या गलथान कारभारामुळे पदवी परीक्षेत ३ एप्रिल या दिवशी गोंधळ उडाला. ‘बी.कॉम.’च्या द्वितीय भाषेतील हिंदी विषयाचे एकूण २ पॅटर्नचे (प्रकारचे) पेपर होते. त्यातील १ पेपर हा श्रेयांकानुसारचा, तर दुसरा वर्ष २०२२ च्या पॅटर्ननुसार होता. मंडळाने दोन्हींच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित होते; मात्र दोघांसाठी एकच समान प्रश्नपत्रिका पाठवली. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर अनुमाने १ घंट्याने पेपर पालटून दिले. त्यामुळे दुपारी १ वाजता पेपर संपण्याऐवजी दुपारी ३ वाजता संपले. (असा गलथान कारभार करून विद्यार्थ्यांना तणावात ढकलणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)

१. विद्यापिठाच्या पदवी परीक्षांना (२ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या ४ जिल्ह्यांच्या २७५ परीक्षा केंद्रांवर प्रारंभ झाला. ‘जुन्या पॅटर्न’च्या रिपीटर (अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुन्हा परीक्षा देणारे) विद्यार्थ्यांच्या या परीक्षा आहेत.

२. द्वितीय भाषेत मराठी, संस्कृत आणि हिंदी असे विषय होते. हिंदीमध्ये पूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ‘रिपीटर’ म्हणून परीक्षा होती. त्यात श्रेयांक हिंदी विषयाचा एक, तर २०२२ च्या पॅटर्ननुसार अन्य पेपर होता. विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदन भरतांना दोन्ही पेपरचे कोड क्रमांक लिहिलेले होते.

३. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांनी दिल्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला.

४. पर्यवेक्षकांनी ही गोष्ट केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रप्रमुखांनी परीक्षा विभागाला कळवले. त्यानंतर परीक्षा विभागाने २ स्वतंत्र पेपर पाठवले; पण त्यात १ घंट्यांचा विलंब झाला होता. मग पुढे उत्तरे लिहिण्यासाठी १ घंटा वाढवून दिला.