हिंदु जनमानसाची ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मानसिकता

‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) पासून पसायदानातून मानवासहित प्राणीमात्रांसाठीही विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अशी समृद्ध विचार-आचारांची मोठी परंपरा आम्हाला लाभली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्मात विश्व मांगल्याची कामना करणारे अनेक श्लोक आणि सुभाषित आहेत. त्या माध्यमातून अगदी पुराण काळापासून विश्व कल्याणाचे आचरण असावे, असा संस्कार मनामनावर बिंबवला जातो; पण असे असूनही हिंदु धर्म आणि संस्कृतीचे अनुसरण करणार्‍यांवर वारंवार आक्रमणे होतात. कधी थेट, तर कधी कुरापती काढून आक्रमणे केली जातात. झुंडशाहीने आक्रमणे करणे, हे तर देशातील काही भागांत नित्याचेच झाले आहे. या घटनांनंतर सुप्रसिद्ध लेखक वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीतील ‘जग माणसाच्या मनातील दयेवर चालत नाही, तर ते मनगटातील बळावर चालते’, या वाक्याची आठवण होते. विचार-आचार आणि तत्त्वज्ञान कितीही चांगले असले, तरी त्यामागे शक्तीसंपन्न संघटित समाजाचे पाठबळ आवश्यक ठरते. मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला, तर विश्व शांती आणि कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा रहात आहे.

१. बेंगळुरूमध्ये (कर्नाटक) हिंदु दुकानदारावर धर्मांधांनी केलेले आक्रमण आणि हिंदूंनी दिलेले प्रत्युत्तर

बेंगळुरू शहरातील सिद्धन्ना गल्ली परिसरातील जुम्मा मस्जिद मार्गावर मुकेश नावाच्या एका व्यक्तीचे दुकान आहे. १७ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या कालावधीत समाजकंटक या दुकानात शिरले. त्यांनी मुकेश यांच्याशी वादावादी आणि शिवीगाळ केली. प्रारंभीला शाब्दिक वाद घातला, तर त्यानंतर मुकेश यांच्यावर आक्रमण केले. दुकानातून बाहेर ओढून त्यांना मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार का घडला, तर मुकेश हे दुकानात सायंकाळच्या वेळी पूजा करत होते. या वेळी ते भजन आणि हनुमान चालीसा लावायचे. समाजकंटकांनी ‘आमच्या अजानच्या वेळी तुम्ही भजने का वाजवता ?’, असा आक्षेप घेऊन त्यांच्यावर हे आक्रमण केले होते. या घटनाक्रमाचे चित्रीकरण ‘क्लोज सर्किट टीव्ही’मध्ये झाले आणि त्याची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली. त्यानंतर या घटनेवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली.

धर्मांधांनी केलेले आक्रमण

यानंतर १९ मार्च या दिवशी मुकेशच्या दुकानासमोरील मार्गावर सहस्रो जण हनुमान चालीसा पठण आणि रामनामाचा जप करण्यासाठी एकत्र आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जमावबंदी लागू केली. या प्रतिक्रियेनंतर मुकेश यांना मारहाण करणार्‍या दोषींना अटक करण्यात आली, तर आंदोलन करणार्‍यांवरही गुन्हे नोंदवण्यात आले. कर्नाटक राज्यात गेल्या वर्षी सत्तांतर झाले आणि काँग्रेसचे सरकार तेथे आले. त्यानंतर कर्नाटकमध्ये या आणि अशा प्रकारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा निव्वळ योगायोग असावा का ? कर्नाटकातच मध्यंतरी झालेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांचे प्रकरण ताजेच आहे. तुष्टीकरण करणारे आणि कथित ‘मोहब्बतचे दुकान’ चालवणारे (काँग्रेस) सत्तेत आल्यानंतर घडणार्‍या या घटना देशभक्त नागरिकांची चिंता वाढवणार्‍या आहेत. समाज मात्र ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.

मुकेशच्या दुकानासमोरील मार्गावर जमलेले सहस्रो जण (सौजन्य: टाइम्स ऑफ इंडिया)

२. धर्मांधांच्या तुष्टीकरणामुळे देशात झालेले भयावह परिणाम

आतापर्यंत धर्मांधांचे तुष्टीकरण केल्यामुळे देशात सामाजिक आणि धार्मिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. देशभरात अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रचले गेले. गोवंश हत्या, अमली पदार्थांची तस्करी यांसह आतंकवाद्यांना साहाय्य करणारा ‘स्लिपर सेल’ (छुपा गट) देशात कार्यरत असल्याचे वेळोेवेळी सिद्ध झाले; पण ‘मोहब्बत की दुकान’ चालवणार्‍यांनी जो चष्मा घातला आहे, त्यातून त्यांच्या दृष्टीस हे काहीच पडत नाही.

३. सध्याच्या जनमानसाची तुष्टीकरणाला ठोस उत्तर देण्याची भूमिका

समाज आणि राष्ट्र यांचे हित गठ्ठा मतांच्या लालसेमुळे त्यांना कवडीमोल वाटते. महाराष्ट्रातही त्यांची हीच भूमिका असल्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला (महाराष्ट्र) पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने १६ गुन्हे नोंद असणारा उमेदवार घोषित केला. दंगल घडवणे, शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचार्‍यांवर आक्रमण करणे, असे गुन्हे नोंद असणारा ‘दंगेखोर’ व्यक्ती विधानसभेत पोचावा, यासाठी काँग्रेस शक्ती पणाला लावणार आहे. काँग्रेसची ही कृती, म्हणजे तुष्टीकरणासाठी ‘वाट्टेल ते’ अशीच आहे; पण देशातील हवा आता पालटली आहे. आता झुंडशाहीला ‘जशास तसे’, तर तुष्टीकरणाला ठोस उत्तर देण्याची भूमिका जनमानसांत दिसून येते.

– नीलेश जोशी, अकोला (२५.३.२०२४)

(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’)