हिंदुत्वाची बाजू अत्यंत प्रखरपणे मांडून समाजात सनातन संस्कृती रुजवून अथक परिश्रम घेणारे आणि निरपेक्षपणे कार्य करणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

आज (५.४.२०२४ या दिवशी) कै. दिलीप सारंगधर यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

कै. दिलीप सारंगधर

२७.३.२०२४ या दिवशी कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. ५.४.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यांची निधन वार्ता ऐकून या ८ दिवसांत १२०० हून अधिक लोक येऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून गेले. यामध्ये कोपरगाव शहर आणि काही आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक, मित्र, नातेवाईक, साधक परिवार, समाजातील प्रतिष्ठित, उद्योजक, अधिवक्ता, व्यावसायिक, तसेच स्थानिक आमदार आणि खासदार यांचा समावेश होता. यावरून ‘त्यांनी पुष्कळ चांगल्या पद्धतीने समाजातील लोकांना जोडून ठेवले होते’, हे लक्षात आले. अनेकांनी कै. दिलीप सारंगधर यांनी केलेल्या धर्मप्रसाराच्या कार्याचा, सर्वांची प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी करणे या गुणांचा आवर्जून उल्लेख केला. त्यातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री. चेतन टेकचंद खुबानी,  संघ स्वयंसेवक, कार्यकर्ता-भाजप, कोपरगाव 

१ अ. कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! : ‘श्री. दिलीप सारंगधर म्हणजे कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! त्यांचे निधन झाल्यानंतर आता ‘कोपरगावमध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्याचे कसे होणार ?’, असे आम्हाला वाटत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात गावात सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य पुष्कळ चांगल्या पद्धतीने केले होते.

शहर आणि तालुक्यातील जवळपास प्रत्येक धार्मिक कार्य आणि धर्मयुद्ध यांत ते सतत अग्रेसर असत. त्यांची उणीव निश्चितच आम्हा सर्वांना आणि प्रत्येक हिंदूला जाणवेल; परंतु ‘पृथ्वीलोकापेक्षा कदाचित् देवलोकात त्यांची जास्त आवश्यकता असेल’, असे मला वाटते. दिलीपभाऊ आता ‘आपले राहिलेले धर्मकार्य स्वर्गलोकातून करतील’, असेच मला वाटते.’

२. श्री. सुशांत घोडके, पत्रकार, स्वच्छतादूत – भारत सरकार, सदस्य – गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ

२ अ. (कै.) दिलीप सारंगधर यांनी सनातन संस्थेचे साधक म्हणून केलेले धर्मकार्य नवतरुणांना सदैव प्रेरणा देत राहील ! : ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विचारावर निष्ठा ठेवून स्व. दिलीपजी सारंगधर यांनी हिंदु धर्माचे मोठे कार्य केले आहे. हिंदु धर्म जनजागृतीचे कार्य करतांना वेळप्रसंगी एकाकी लढा दिला. ‘श्री गणेशमूर्ती गोदावरी नदीपात्रातील पाण्यात शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जित व्हाव्यात’, यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाले. भारतवर्ष परंपरेतील सण-उत्सवाचे महत्त्व जाणून ते साजरे करण्याची विशिष्ट पद्धत जनमानसात निःस्वार्थपणे रुजवली. सनातन संस्थेचे साधक म्हणून केलेले धर्मकार्य नवतरुणांना सदैव प्रेरणा देत राहील. सारंगधर परिवाराच्या समवेत आम्ही सर्व जण आहोत. ‘स्व. दिलीपजी यांचे कार्य समुहाने एकत्र येऊन पुढे नेणे’, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
गुरुदेव दत्त ! जय श्रीराम !’

कै. दिलीप सारंगधर यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी कोपरगाव येथे धर्मप्रेमींकडून ठिकठिकाणी असे फलक लावण्यात आले आहेत.

३. ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे 

३ अ. ‘श्री. दिलीप सारंगधर यांचे निधन झाले, त्या दिवशी तुकाराम बीज होती. त्यामुळे ते पुढच्या गतीला गेले आहेत.’

४. हिंदुत्वनिष्ठ नारायण अग्रवाल

४ अ. एका धर्मयोद्ध्याला भावपूर्ण श्रद्धांजली : ‘एखादा वटवृक्ष कोसळावा आणि त्यामुळे धरणीकंप व्हावा’, अशी दुर्दैवी घटना २७.३.२०२४ या दिवशी कोपरगावात दुपारी अडीच वाजता घडली. प्रख्यात, प्रखर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते स्व. दिलीप सारंगधर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. स्व. दिलीपराव हे कोपरगाव शहरातच नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्रात हिंदूंच्या रक्षणासाठी झटणारे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अकस्मात् जाण्याने संपूर्ण कोपरगाव क्षणभर सुन्न झाले. पूर्ण शहरात शोककळा पसरली. सनातन संस्थेचे मुखपत्र दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रचार आणि प्रसार करण्यात स्व. दिलीपराव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले.

४ आ. कोणताही धार्मिक कार्यक्रम दिलीप सारंगधर यांच्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाविना पूर्ण होत नव्हता ! : कोपरगाव शहरात हिंदूंचा मोर्चा असो कि आंदोलने, स्व. दिलीपराव यांच्याविना पूर्ण होणे नाही. ते अत्यंत प्रखरपणे आपली बाजू मांडण्यात प्रसिद्ध होते. मनमिळाऊ स्वभाव आणि सहकार्याची भावना यांमुळे ते जनतेत लोकप्रिय होते. धार्मिक कार्यक्रम कोणताही असो; पण त्यांच्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाविना पूर्ण होत नव्हता.

४ इ. त्यांच्या या कार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहकार्य करत असे.
शेवटी स्वर्गीय दिलीपराव यांच्या कार्यामुळे परमेश्वर नक्कीच त्यांना सद्गती देईल, यात तीळमात्र शंका नाही.’

५. विजय सू. वहाडणे, माजी नगराध्यक्ष, कोपरगाव 

५ अ. कै. दिलीप सारंगधर यांनी सनातन हिंदु धर्म आणि सनातन आदर्श परंपरा-संस्कृती समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेणे : स्व. दिलीपराव सारंगधर यांनी संपूर्ण आयुष्यभर अतिशय निःस्वार्थ-निरपेक्ष राहून सनातन हिंदु धर्म आणि सनातन आदर्श परंपरा-संस्कृती समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. असे निःस्वार्थ कार्यकर्ते लाभणे अतिशय कठीण झाले आहे. स्व. दिलीपराव यांचे अकाली निधन होणे, हे सनातन हिंदु धर्म अन् समस्त हिंदूंसाठी आणि मला व्यक्तीशः दुःखदायक अन् वेदनादायक आहे.

५ आ. कै. दिलीप सारंगधर यांच्या निधनानंतर आलेल्या रंगपंचमीच्या दिवशी सर्वांनी दुखवटा पाळून कुणीही रंगपंचमी साजरी न करणे : प्रतिवर्षी ते रहात असलेल्या गल्लीत मोठ्या प्रमाणात रंगपंचमी उत्सव साजरा केला जायचा. या वर्षी त्यांच्या निधनानंतरच्या चवथ्या दिवशी रंगपंचमी सण आला होता; पण गल्लीत या वर्षी दुखवटा पाळला गेला आणि कुणीही रंगपंचमी साजरी केली नाही.

श्री. दिलीप सारंगधर यांनी त्यांच्या कार्यामुळे, तसेच लोकांशी केलेल्या जवळीकतेमुळे अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. सर्वांना वेळोवेळी करत असलेल्या मार्गदर्शनामुळे, तसेच निःस्वार्थी भावामुळे ते सर्वांचा आधार बनले होते. एक प्रकारे त्यांनी समष्टी स्तरावरील गुरुकार्यात आदर्श निर्माण केला होता. श्री. दिलीप सारंगधर यांच्या निधनानंतर गावात उत्स्फूर्तपणे त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ‘होर्डिंग्स’ (फलक) लावण्यात आले आहेत.’

– श्री. किरण दुसे (कै. दिलीप सारंगधर यांचे जावई), हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर. (३.४.२०२४)