|
त्र्यंबकेश्वर (नाशिक) – त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्हे यांनी ‘त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ घंटे देखरेख करण्यात यावी, तसेच याविषयीच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा’, असे निर्देश दिले. हा वज्रलेप १३ जानेवारी २०२४ या दिवशी निखळला; पण मंदिर ट्रस्ट प्रशासनाने याविषयी गुप्तता पाळली. मागील वर्षीही वज्रलेप निखळला होता. यंदा त्याचे प्रमाण अल्प आहे. ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मंदिर बंद ठेवून वज्रलेपाची प्रक्रिया केली.
पुरातत्व विभाग ज्योतिर्लिंग आणि मंदिराची वास्तू यांविषयी बेफिकीर ! – ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान
त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्व विभागाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या सूचीत आहे; पण पुरातत्व विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आम्ही वेळोवेळी या विभागाकडे पत्रव्यवहार केला; पण संबंधित अधिकारी हे ज्योतिर्लिंग आणि मंदिराची वास्तू यांविषयी बेफिकीर आहे.