India UNSC Membership : भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

सूरत (गुजरात) – भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात केले. उपस्थितांनी डॉ. जयशंकर यांना याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारत अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. इतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे; पण चीन यामध्ये आडकाठी घालत आहे.

डॉ. जयशंकर म्हणाले की,

१. संयुक्त राष्ट्रांची स्थापना सुमारे ८० वर्षांपूर्वी झाली होती. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या ५ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी जगात ५० देश स्वतंत्र होते. नंतर त्यांची संख्या १९३ झाली; परंतु या ५ देशांनी संयुक्त राष्ट्रांवर त्यांचे नियंत्रण कायम ठेवले आहे; पण आता त्यात पालट करण्यासाठी त्यांना सांगावे लागत आहे, ही विचित्र गोष्ट आहे.

२. भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याविषयी काही देश सहमत आहेत, काही जण प्रामाणिकपणे त्यांचे मत व्यक्त करतात; पण काही देश असे आहेत, जे पाठीमागून काही गोष्टी करतात. हे अनेक वर्षांपासून चालू आहे. आता पालट झाला पाहिजे. ‘भारताला स्थायी सदस्यत्व मिळाले पाहिजे’, अशी भावना जगभरात निर्माण झाली आहे. ही भावना वाढतच चालली आहे. आम्ही ते नक्कीच साध्य करू; पण कठोर परिश्रमाविना काहीही साध्य होत नाही. आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

३. भारत, जपान, जर्मनी आणि इजिप्त या देशांनी मिळून संयुक्त राष्ट्रांसमोर एक प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आता ही गोष्ट आणखी पुढे जाऊ शकते; परंतु आपण दबाव आणला पाहिजे.

४. युक्रेन युद्ध आणि गाझावरील आक्रमण यांवरून संयुक्त राष्ट्रांमध्ये गोंधळ उडाला होता. याविषयी एकमत होऊ शकले नाही. मला असे वाटते की, ही भावना जसजशी वाढत जाईल तसतशी आमची स्थायी जागा मिळण्याची शक्यता वाढत जाईल.

पंतप्रधान नेहरू यांनी भारतापेक्षा चीनचे हित पुढे ठेवले ! – डॉ. जयशंकर

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतापेक्षा चीनच्या हिताला प्राधान्य दिले, असे विधान परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तर केले.

१. डॉ. जयशंकर म्हणाले की, वर्ष १९५० मध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी नेहरूंना चीनबद्दल चेतावणी दिली होती. पटेल यांनी नेहरूंना सांगितले होते, ‘आपण पहिल्यांदाच चीन आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी आघाडीला सामोरे जात आहोत, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही घडली नव्हती.’

२. पटेल यांनी नेहरूंना असेही सांगितले होते की, चिनी लोक काय बोलत आहेत यावर त्यांचा विश्‍वास नाही. चिनी लोकांचे हेतू वेगळे दिसत आहेत आणि आपण या बाबतीत अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे.

३. यावर नेहरूंनी पटेल यांना सांगितले होते की, ते चिनी लोकांवर अकारण संशय घेतात. हिमालयातून भारतावर आक्रमण करणे कुणालाही अशक्य आहे. नेहरू चीनचा धोका पूर्णपणे नाकारत होते. त्यानंतर काय झाले, ते सर्वांना ठाऊक आहे.

नेहरूंमुळे चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळाले !

डॉ. जयशंकर म्हणाले की, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी जागेबद्दल चर्चा झाली आणि ही जागा भारताला देऊ केली गेली, तेव्हा नेहरूंची भूमिका अशी होती की, आमचाही या जागेवर हक्क आहे; परंतु चीनला ती आधी मिळाली पाहिजे.

काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांत नेण्यास पटेल यांनी विरोध केला होता !

डॉ. जयशंकर यांनी काश्मीर प्रश्‍नावर सांगितले की, सरदार पटेल यांना काश्मीरचा वाद संयुक्त राष्ट्रांत नेण्याची इच्छा नव्हती; पण नेहरूंनी तेच केले. सरदार पटेल यांना ठाऊक होते की, संयुक्त राष्ट्रे पक्षपाती आहे.