US On Khalistani Pannu : अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असल्याने आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर कारवाई होऊ शकत नाही ! – अमेरिका

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असून ते संरक्षित आहे. आम्ही आमच्या कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला दुसर्‍या देशाकडे सोपवतो. नुसते बोलण्यासाठी कुणाला अटक होऊ लागली, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि धोकादायक होईल, असे उत्तर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. (खलिस्तानी आतंकवाद्यांकढून  भारतीय नेत्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करण्यासाठी चिथावणी दिली जात आहे, हे अमेरिकेला दिसत नाही, असे कसे म्हणता येईल ? – संपादक) ‘पन्नू प्रतिदिन भारताला धमक्या देतो. त्याच्यावर कारवाई का होत नाही ?’ या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले.

सौजन्य: ANI News

१. गार्सेटी पुढे म्हणाले की, बरेच लोक म्हणतात की, आम्ही अशा लोकांना (पन्नू) अटक का करत नाही ? याचे उत्तर आहे की, अमेरिकेची व्यवस्था वेगळी आहे. मी राजदूत आहे आणि नियम पालटू शकत नाही. कधी कधी आमचीही हानी होते. मी ज्यू आहे आणि माझ्या स्वतःच्या शहरातील ज्यूंविषयी मला अनेकदा वाईट बोलले गेले आहे; पण आम्ही त्या लोकांना अटक करत नाही. त्यांनी हिंसा केली, तर कायद्यानुसार कारवाई होते.

२. कुणीही लक्ष्मण रेखा ओलांडू नये. कोणत्याही देशाचा किंवा सरकारचा कर्मचारी परदेशी नागरिकाच्या हत्येच्या कटात सहभाग असता कामा नये, असे विधान खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी भारत आणि अमेरिका संयुक्तपणे अन्वेषण करत आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. गार्सेट्टी म्हणाले की, मला फार आनंद होत आहे की, भारत आमच्यासमवेत या प्रकरणाची चौकशी करत आहे. हत्येचे कंत्राट कुणाला देण्यात आले होते का ?, हे जाणून घ्यायचे आहे. आतापर्यंत आम्ही भारताकडून जे काही सहकार्य मागितले, ते आम्हाला मिळाले आहे. आणि हे आम्ही देखील केले आहे.

३. एका प्रश्‍नाच्या उत्तरात गार्सेटी यांनी मान्य केले की, भारत आणि अमेरिका अनेक सूत्रांवर भिन्न विचार करत आहेत.

(म्हणे) सीएए कायद्याची कार्यवाही कशी होणार ? यावर लक्ष ठेवणार ! – अमेरिकेचा पुनरूच्चार

भारताच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी (‘सीएए विषयी) गार्सेट्टी म्हणाले, ‘कधी कधी असहमतीसाठीही संमती आवश्यक असते. या कायद्याची कार्यवाही कशी होते ? यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत.’ अमेरिकेच्या या धोरणावर भारताने यापूर्वीच टीका केली आहे, असे सांगितल्यावर गार्सेटी म्हणाले की, सशक्त लोकशाहीसाठी धार्मिक स्वातंत्र्य आवश्यक आहे आणि कधी कधी यावर विचार करणे वेगळे असते. दोन्ही देशांमध्ये जवळचे संबंध आहेत. अनेक वेळा मतभेद होतात; पण त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होत नाही. आपल्या देशात (अमेरिकेत) अनेक त्रुटी आहेत आणि आपण टीकाही सहन करतो.

संपादकीय भूमिका

  • भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल !
  • खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.