‘आय.पी.एल्.’च्या एका सामन्याच्या झालेल्या वादातून क्रिकेटप्रेमीची हत्या !

हणमंतवाडी (कोल्हापूर) येथील घटना !

कोल्हापूर – हणमंतवाडी येथील बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे एका घरात ‘आय.पी.एल्.’मधील ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘सनराईझर्स हैदराबाद’ यांच्यातील सामना पहात होते. हे दोघेही ‘मुंबई इंडियन्स’च्या बाजूने होते. सामन्यात हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने दोघांना चांगलाच राग आला. अशातच धावांचा पाठलाग करतांना ‘मुंबई इंडियन्स’चे रोहित शर्मा बाद होताच ‘चेन्नई सुपर किंग्ज’चे चाहते बंडोपंत तिबिले त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी ‘रोहित शर्मा बाद झाल्याने मुंबई कशी जिंकणार ?’, असे म्हणत आनंद व्यक्त केला. यामुळे राग अनावर होऊन बळवंत झांजगे आणि सागर झांजगे यांनी तिबिले यांना मारहाण करून त्यांचे डोके फोडले. यात गंभीर घायाळ होऊन तिबिले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बळवंत आणि सागर यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

‘आय.पी.एल्.’ (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धा निव्वळ व्यावसायिक हेतूने खेळवली जाते. यातून आस्थापने आणि त्यांनी विकत घेतलेले खेळाडू प्रचंड अर्थार्जन करतात. असे असतांना अशा भयावह घटनांतून जनतेची वैचारिक आणि भावनिक पातळी यांचा दर्जा किती खालावला आहे, हेच लक्षात येते !