तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष !

स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ !

स्मशानभूमी परिसरातील कचरा

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – तळेगाव रेल्वेस्थानक परिसरातील यशवंतनगर येथील ३ कोटी १० लाख रुपये व्यय करून नगर परिषदेने बांधलेली स्मशानभूमी गॅस टाक्यांअभावी २ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक भागातील नागरिकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील गाव विभागातील बनेश्वर स्मशानभूमी येथे ४ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. यशवंतनगर येथील स्मशानभूमी ‘असून अडचण, नसून खोळंबा’, अशी स्थिती आहे.

तळेगाव रेल्वेस्थानक परिसरांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी गाव विभागात बनेश्वर स्मशानभूमी आहे. नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने रेल्वेस्थानक परिसरामध्ये नगर परिषदेकडून वर्ष २०१९ मध्ये स्मशानभूमीच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. वर्ष २०२२ मध्ये ते काम पूर्ण झाले. या ठिकाणी गॅस दाहिनी, दशक्रिया मंडप, तसेच मृतदेह दहनासाठी ३ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु तेथे अद्यापपर्यंत लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या नाहीत. गॅस टाकी उपलब्ध नसते. ज्या लोखंडी जाळ्या आहेत, त्यांचा वापर नसल्याने त्याला गवताचा वेढा पडला आहे. वर्ष २०२२ मध्ये काम पूर्ण झाले असे सांगत असले, तरी ते काम अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. (स्मशानभूमीचे बांधकाम अर्धवट असतांना काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला कसा ? ठेकेदारास याचे देयक दिले आहे का ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – संपादक)

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे म्हणाले की, रेल्वेस्थानक भागातील स्मशानभूमीचे वर्ष २०२२ मध्ये काम पूर्ण झाले; परंतु गॅस दाहिनी बसवण्यात विलंब झाला. त्यामुळे ती स्मशानभूमी वापरात नव्हती. ती आता चालू करण्यात येईल.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे म्हणाले, ‘‘तळेगाव रेल्वेस्थानक विभागातील नागरिकांच्या स्मशानभूमीच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. यशवंतनगर भागामध्ये धुराचा त्रास होत होता. त्यामुळे गॅस शवदाहिनीचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गॅसच्या टाक्या बसवण्यासाठी एका ठेकेदाराला काम दिले आहे. लवकरच ती स्मशानभूमी चालू होईल.’’ (गेल्या २ वर्षांपासून काम अपूर्ण आहे, हे ठाऊक असून त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !