जेरुसलेम – हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले. या आक्रमणात इराण समर्थित हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.
सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलने रात्री १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे आक्रमण केले. स्थानिकांच्या माहितीनुसार अनुमाने २ घंटे स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. याच कालावधीत इदलिब शहरातून काही आतंकवादी संघटनांनी ड्रोनद्वारे आक्रमण केले. दुसरीकडे इस्रायलने मात्र अद्याप या आक्रमणाला दुजोरा दिलेला नाही.