बीजिंगला मागे टाकत मुंबई अब्जाधिशांची राजधानी !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – भारताची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील अब्जाधिशांची राजधानी झाली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबई अब्जाधिशांच्या सूचीत प्रथम स्थानी आरूढ झाली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईतील अब्जाधिशांच्या सूचीत लक्षणीय वाढ झाली आहे.

आशिया खंडात अव्वल क्रमांक मिळवलेली मुंबई जागतिक स्तरावरही तिसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूयॉर्क, दुसर्‍या क्रमांकावर लंडन आणि तिसर्‍या क्रमांकावर मुंबई आहे. चीनमध्ये ८१४ अब्जाधीश आहेत, तर भारतात २७१ आहेत.  शहरांच्या तुलनेत विचार करायचा झाल्यास मुंबईमध्ये ९२ अब्जाधीश आहेत, तर बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत, असे ‘हुरुन रिसर्च २०२४’ च्या जागतिक श्रीमंतांच्या सूचीतून स्पष्ट होत आहे.

१. मुंबईची एकूण अब्जाधिशांची संपत्ती ४४५ अब्ज डॉलर (३७.०९ लाख कोटी रुपये) इतकी आहे. ही संपत्ती मागील वर्षांच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढली आहे, तर बीजिंगची एकूण अब्जाधिशांची संपत्ती २६५ अब्ज डॉलर इतकी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी अल्प झाली आहे.

२. जगातील शीर्ष स्तरावरील २० श्रीमंतांमध्ये केवळ दोन भारतीय आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी १० व्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी १५व्या स्थानावर आहेत.

संपादकीय भूमिका :

अब्जाधिशांची राजधानी झालेली मुंबई गुन्हेगारीमुळे असुरक्षितही आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही !