‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचा देहत्याग

‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज

कोलकाता – ‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांनी २६ मार्च या दिवशी देहत्याग केला. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वामी स्मरणानंद हे वर्ष २०१७ मध्ये ‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष बनले होते.

२९ जानेवारी २०२४ या दिवशी युरिनमध्ये इन्फेक्शन झाल्याच्या कारणास्तव त्यांना ‘रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान’मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने ३ मार्चला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. २६ मार्चला अखेर स्वामीजींनी अखेरचा श्‍वास घेतला. ‘रामकृष्ण मिशन’च्या वतीने अधिकृतपणे स्वामीजींच्या देहत्यागाचे वृत्त देण्यात आले आहे. महाराजांनी रात्री ८ वाजून १४ मिनिटांनी महासमाधी घेतल्याचे  ‘रामकृष्ण मिशन’कडून सांगण्यात आले.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

त्यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘रामकृष्ण मठ आणि ‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी त्यांचे जीवन अध्यात्म अन् सेवा यांसाठी समर्पित केले होते. महाराजांनी असंख्य मनांवर आणि बुद्धीवाद्यांवर स्वतःचा प्रभाव निर्माण केला होता. त्यांची करुणा आणि बुद्धीमता पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असेल.’’ या वेळी पंतप्रधानांनी स्वामीजींसमवेत वर्ष २०२० मध्ये बेलुर मठात झालेल्या त्यांच्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा दिला.