परदेशातून पाठवलेल्या कुरिअरच्या पाकिटामध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करत फसवणूक !
पुणे – पोलीस कारवाईची भीती दाखवून, परदेशातून पाठवलेल्या कुरिअरच्या पाकिटामध्ये अमली पदार्थ, परेदशी चलन सापडल्याची बतावणी करत बाणेर भागातील एका आधुनिक वैद्याची ‘सायबर’ चोरांनी १ कोटी १ लाख ३० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी आधुनिक वैद्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
चोरांनी तक्रारदार आधुनिक वैद्यांशी संपर्क केला. ‘तुमच्या नावाने परदेशातून पाकिट (पार्सल) आले असून त्यामध्ये ४ पारपत्र, अमली पदार्थ, परदेशी चलन, भ्रमणसंगणक सापडला आहे. आपणास मुंबई गुन्हे शाखेत अन्वेषणासाठी यावे लागेल. आम्ही पोलीस अधिकारी बोलत आहोत’, असे सांगून त्यांना भीती घातली. त्यांच्याकडून अधिकोषाची माहिती घेऊन चोरांनी त्यांच्या अधिकोषातील खात्यातून पैसे काढले. (‘ऑनलाईन’ पद्धतीने केली जाणारी फसवणूक रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे ! वाढत्या सायबर चोरीवर पोलीस कधी नियंत्रण आणणार ? – संपादक)