उष्णता निर्देशांकाचा आकडा घोषित करण्याची पद्धत अद्याप चालू नाही !


मुंबई – उष्णता निर्देशांक ३५ अंश सेल्सिअसपेक्षा न्यून, ३५ ते ४५ अंश, ४६ ते ५५ अंश आणि ५५ अंशांच्या पुढे अशा चार श्रेणी आहेत. या श्रेणींनुसार मुंबईमध्ये २२ मार्च या दिवशी ३५ ते ४५ अंशांदरम्यान उष्णता निर्देशांक होता, तर सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत हा निर्देशांक ४६ ते ५५ अंशांच्या पुढे असल्याची नोंद झाली.

उष्णता निर्देशांक घोषित करण्याचे आश्वासन भारतीय हवामान विभागाने वर्ष २०२३ मध्ये दिले होते. त्यामुळे हा निर्देशांक सर्वसामान्यांच्या सोयीसाठी कधी सांगण्यात येणार, अशी चर्चा आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ‘मौसम डॉट आयएम्डी डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून या उष्णता निर्देशांकाचा थेट आकडा दिला जात नाही; मात्र या निर्देशांकाची श्रेणी नोंदवली जात आहे. यामध्ये या माध्यमातून आगामी चार ते पाच दिवसांसाठीचा उष्णता निर्देशांकाचा अंदाजही उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत २ दिवस अधिक उष्णता

पावसाळ्याच्या आधी वातावरणात आर्द्रता वाढली की, मुंबईमधील उकाड्याची तीव्रता वाढू लागते. सध्या आर्द्रतेमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांना पुष्कळ प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. २२ मार्च या दिवशी सांताक्रूझ येथे ३५.४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस होते. २ दिवसांत उकडण्याचा भाग न्यून होईल, असे हवामान विभागाने सांगितले.