साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
व्यक्तीच्या हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषा, त्यांचा एकमेकांशी असणारा संयोग, चिन्हे, उंचवटे आणि आकार यांवरून व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, आयुर्दाय (आयुष्यमान), भाग्य, प्रारब्ध इत्यादी गोष्टी जाणून घेता येतात. या शास्त्राला ‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्र’ या नावाने ओळखले जाते. या प्राचीन विद्येच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य करण्यात येणार आहे. हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर असेल. साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांचा हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राविषयी अभ्यास असल्यास ते या कार्यात सहभागी होऊ शकतात.
सध्या फोंडा, गोवा येथील संशोधन केंद्रात हस्त-पाद सामुद्रिक शास्त्रासंबंधी पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. संशोधन करावयाचे आध्यात्मिक विषय
१ अ. व्यक्तीला आध्यात्मिक स्वरूपाचा त्रास असणे : व्यक्तीचे अनिष्ट प्रारब्ध आणि सध्याच्या काळाची प्रतिकूलता या कारणांमुळे सूक्ष्मातून अस्तित्त्वात असलेल्या अनिष्ट शक्ती व्यक्तीला विविध प्रकारे त्रास देतात. याला ‘आध्यात्मिक त्रास’ म्हणतात. हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राद्वारे ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.
१ आ. व्यक्तीचा जन्म उच्च लोकांतून होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्रांहून अधिक बालकांना ओळखले आहे. त्यांना ‘दैवी बालक’ ही संज्ञा आहे. ही बालके जन्मतः आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत. या बालकांपैकी जे बालक आता युवावस्थेत पोचले आहेत, त्यांचा हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून ‘त्यांचा जन्म उच्च लोकांतून झाल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.
१ इ. संत आणि सद्गुरु यांच्या संदर्भातील संशोधन : गुरुकृपायोगानुसार साधना करून १.३.२०२४ पर्यंत १२७ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. त्यांपैकी १७ संत सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत. ‘संत आणि सद्गुरु यांचा हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण तथ्ये आढळतात का ?’, याचा अभ्यास करायचा आहे.
आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्ती, उच्च लोकांतून जन्म घेतलेली मुले आणि संत अन् सद्गुरूपद प्राप्त केलेले साधक यांच्या हाता-पायांच्या तळव्यांचे काही ठसे आणि छायाचित्रे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संग्रही आहेत.
२. हस्त-पाद सामुद्रिक शास्त्रविषयक ग्रंथांची निर्मिती
हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राची माहिती समाजाला व्हावी, तसेच नवीन संशोधन होऊन शास्त्राचे संवर्धन व्हावे, यासाठी या शास्त्रासंबंधी ग्रंथांची निर्मिती करण्याचा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा मानस आहे. विश्वविद्यालयाच्या संग्रहात असलेले लिखाण, संदर्भ ग्रंथ आणि नवीन संशोधन यांच्या आधारे ग्रंथांची निर्मिती शक्य आहे. ग्रंथांची निर्मिती जलद गतीने होण्यासाठी लिखाणाचे संकलन करणे, ग्रंथांच्या अनुक्रमणिका सिद्ध करणे, अनुक्रमणिकेनुसार लिखाण लावून त्याचे अंतिम संकलन करणे इत्यादी सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
आवश्यक कौशल्य:
यासाठी हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राचे ज्ञान, तसेच संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रंथसंकलन शिकवणे सुलभ होईल. ही सेवा घरी राहूनही करता येईल.
वरील सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर किंवा टपाल पत्त्यावर पाठवावी. ई-मेल पाठवतांना त्याच्या विषयामध्ये ‘हस्त-पाद सामुद्रिक’ (Hast-Paad Samudrik) असा कृपया उल्लेख करावा.
टपालासाठी पत्ता
श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |