Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी अनिवासी भारतियांमध्ये अभूतपूर्व उत्साह !

मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रचार !

मुंबई – २२ मार्च या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी जगभरातील अनिवासी भारतियांमध्ये अभूतपूर्व उत्साह पहायला मिळत आहे. ‘सनातन प्रभात’शी बोलतांना चित्रपटाच्या मुख्य प्रचारकाने (‘मार्केटिंग मॅनेजर’ने) ही माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते रणदीप हुडा अन् संबंधित कलाकार यांच्यापर्यंत जगभरातील हिंदू माहिती पाठवीत आहेत. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचा इतिहास आणि वीर सावरकर यांच्यासारख्या अगम्य स्वातंत्र्यसेनानींचा जीवनपट अधिकाधिक भारतियांपर्यंत पोचवायची इच्छा आहे.

आतापर्यंत आम्हाला अर्धसत्य शिकवले गेले ! – ब्रिटनमधील हिंदू

ब्रिटनचे रहिवासी शक्ती लोहार यांनी हुडा यांना नुकताच ‘ईमेल’ केला. त्यात ते म्हणतात, ‘ब्रिटनमधील आम्हा भारतियांना या चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) पुष्कळ आवडला आणि आम्हाला आशा आहे की, चित्रपट पुष्कळ यशस्वी होईल. हा चित्रपट आपल्याला आणि येणार्‍या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शिक्षित करेल. ब्रिटनमध्ये आमचा समुदाय खूप बळकट आहे आणि आम्ही लंडनमध्ये एक हिंदु सांस्कृतिक केंद्र चालवतो. या चित्रपटाचे समर्थन आणि प्रचार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. भारतीय क्रांतीविरांचे खरे सत्य लोकांना कळावे, अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत आम्हाला केवळ चुकीचे आणि अर्धसत्य शिकवले गेले !’

४ अमेरिकी शहरांत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे चित्रपटाचा ऐतिहासिक प्रचार !

चित्रपटाचा प्रचार करणारे अमेरिका येथील मॅनहॅटनच्या आकाशात ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’ !

अमेरिकेतील अनिवासी भारतियाने रणदीप हुडा यांना एक ‘ई-मेल’ पाठवला असून त्यामध्ये एक संदेश आणि व्हिडिओ ही जोडला आहे. या संदेशात म्हटले आहे, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होणे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मॅनहॅटन शहराच्या हडसन नदीवर दैदीप्यमान ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अमेरिका भव्य स्वागत करत आहे !’, अशा प्रकारे संदेश देण्यात आला. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, टेटरबोरो आणि लागार्डिया या चार हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांकडून विशेष अनुमती मिळवून या अविस्मरणीय उपक्रमाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. ९/११ नंतर प्रथमच शहरात नऊ ठिकाणी ‘यूएस्ए वेलकम्स वीर सावरकर’ असा संदेश देत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’ प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ऑस्ट्रलियातही व्यापक जागृती !

ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतियांच्या एका गटाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी आणि या चित्रपटाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक अद्वितीय ‘नेटवर्क’ सिद्ध केले आहे. हुडा यांच्याशी बोलतांना ऑस्ट्रेलियातील भारतियांनी सांगितले की, त्यांनी चित्रपटाचे ट्रेलर आणि ऐतिहासिक माहिती यांसह एक ई-मेल सिद्ध केला अन् मेलबर्न, सिडनी आणि पर्थ येथे रहाणार्‍या भारतियांना पाठवला.