- ३०० कोटी रुपयांचे १३३ किलो ‘मॅफेड्रोन’ जप्त
- संबंधितांकडून ११ किलो सोने हस्तगत
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणार्या ललित पाटील याच्यासह १४ जणांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या’न्वये (मकोका) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ सहस्र १५० पानांचे दोषारोपपत्र (आरोपपत्र) प्रविष्ट (दाखल) केले आहे. मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.आर्. कोचरे यांच्या न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र प्रविष्ट केले. अमली पदार्थ विक्री संदर्भातील प्रकरणांमध्ये ‘मकोका’ अंतर्गत प्रविष्ट केलेले हे पहिलेच दोषारोपपत्र आहे.
दोषारोपपत्रानुसार ललित हा ‘ससून रुग्णालया’मध्ये राहून अमली पदार्थांची विक्री करणारी साखळी चालवत होता. त्याच वेळी ‘ससून’च्या प्रवेशद्वाराजवळ २ कोटी १४ लाख रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त केले गेले. त्यानंतर ललित ‘ससून’मधून पसार झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. ससून रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील आधुनिक वैद्य यांचा या प्रकरणांमध्ये समावेश आढळून आला. ४ पोलीस कर्मचार्यांसह इतर ६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.