बीड – शेतकर्यांच्या १ लाख ६० सहस्र रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ मार्च या दिवशी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहाणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकर्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.
किसान क्रेडिट कार्ड’च्या ‘डिजिटायझेशन’ प्रकल्पाचा शुभारंभ या वेळी करण्यात आला. या प्रणालीद्वारे शेतकर्याला कागदपत्र विरहित आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. बीड जिल्ह्यातील महसूल, कृषि अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांत ४ लाख ७५ सहस्र शेतकर्यांची नोंदणी करून त्यांचे ‘फार्मर्स आयडी’ सिद्ध केले आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील २२ शेतकर्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जाची थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. देशातील २ जिल्ह्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये बीडचा समावेश आहे. |