‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी (‘एआय’विषयी) मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना आणि ती प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सर्वांत अधिक चर्चा चालू झाली ती म्हणजे ‘ओपन एआय आस्थापना’च्या ‘चॅट जीपीटी’च्या आगमनामुळे ! ‘चॅट जीपीटी’च्या वेगवान आणि अचूक उत्तरे देण्याच्या पद्धतीमुळे जगप्रसिद्ध पारंपरिक ‘सर्च इंजिन’ (संकेतस्थळावर माहिती शोधणारी प्रणाली) ‘गूगल’चे महत्त्व न्यून होणार, गूगल कालबाह्य होणार’, अशी चर्चा चालू झाली. गूगलने स्वत: या नवीन संगणकीय प्रणालीकडे लक्ष ठेवल्यावर काही दिवसांमध्येच त्यांना जाणीव झाली की, कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून केलेल्या या नवीन आविष्कारासमोर त्यांना टिकणे अवघड होणार आहे आणि ‘सर्च इंजिन’ म्हणून गूगलची असलेली मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. या त्यांच्या समोरील मोठ्या आव्हानाची लागलेली चाहूल आणि स्पर्धेत टिकण्याची धडपड यातून गूगलने ‘जेमिनी एआय’ प्रणाली विकसित केली.
१. कृत्रिम बुद्धीमत्ता
अमेरिकी संगणकतज्ञ जॉन मॅकर्थी हे कृत्रिम बुद्धीमत्तेचे जनक मानले जातात. मानवी बुद्धीमत्तेप्रमाणे कार्य करणारी, विश्लेषण करू शकणारी, व्यक्तींच्या भावना, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा रोख ओळखून त्याप्रमाणे त्याला प्रतिसाद देणारी कृत्रिम बुद्धीमत्ता बनवल्यास अनेक संगणकीय प्रक्रियांना गतीमान होण्यासाठी, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अचूक कृती करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने त्यांनी काही संशोधन केले, प्रयोग केले आणि नंतर तिचा विकास टप्प्याटप्याने झाला आहे. आता संवाद साधू शकणारी ‘चॅटबॉट’ प्रणाली, मनुष्यासारखे दिसणारे ‘रोबोट’ मानवी प्रतिसाद देण्यापर्यंत काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
२. कृत्रिम बुद्धीमत्तेचे लाभ
अ. कृत्रिम बुद्धीमत्तेत मानवी चुका नाहीत, निर्णय प्रक्रिया निष्पक्ष असण्याची शक्यता अधिक आहे.
आ. विशिष्ट क्रमांमध्ये केल्या जाणार्या प्रक्रिया, कृती या चांगल्या प्रकारे करू शकतो, त्यामुळे धोका नाही.
इ. पुन:पुन्हा करावयाच्या कृतींसाठी चांगला पर्याय, वेगवान निर्णय, २४ घंटे संबंधित सुविधा उपलब्ध असणार इत्यादी अनेक लाभ आहेत. त्यामुळे तिचा उपयोग वाढत आहे आणि आगामी काळात वाढणार आहे.
ई. गूगलकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून काही वेब-इंटरनेट आधारीत ‘टूल्स’ विकसित करण्यात आले आहेत. ‘गूगल असिस्टंट’, ‘गूगल सर्च’, ‘गूगल फोटोज्’, ‘गूगल ट्रान्सलेट’ इत्यादी काही ‘एआय’ची उदाहरणे आहेत.
३. अवकाश मोहिमांमध्ये उपयोग
भारतातील प्रसिद्ध किंवा नावाजलेली आस्थापने ‘एआय’चा समावेश करत आहेत. त्यातील सर्वांत माहितीतील उदाहरण, म्हणजे ‘चंद्रयान ३’ची मोहीम. यामध्ये चंद्राचा पृष्ठभागाचा अचूक अंदाज घेत शेकडो ‘सेन्सर्स’द्वारे मिळत असलेल्या माहितीचे सातत्याने विश्लेषण करत आणि ‘चंद्रयाना’च्या ‘लँडर’ (अवतरक) योग्य जागी यशस्वीरित्या उतरवण्यासाठी ‘एआय’चा उपयोग झाला. ‘प्रज्ञान रोव्हर’ला (बग्गीला) चालवण्यासाठीही कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात आला. ‘इस्रो’च्या (भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या) आगामी गगनयान आणि अन्य मोहिमांमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
४. संरक्षण क्षेत्र
भारतीय सैन्याने भारत ‘डॉग म्यूल’ हा कुत्र्याच्या आकाराप्रमाणे रोबोट सिद्ध केला आहे. या ‘डॉग म्यूल’ला अतिशय खडतर नैसर्गिक परिस्थितीत सैनिकी कारवाईसाठी वापरता येऊ शकते, म्हणजे एखाद्या दुर्गम भागात जाणे (बर्फाळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश, दलदल इत्यादी), शत्रूचे निरीक्षण करणे आणि प्रत्यक्ष आक्रमण करणे यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. याची चाचणीही नुकतीच घेण्यात आली.
चीनने भारतीय सीमांच्या ठिकाणचा बर्फाच्छादित प्रदेश आणि दुर्गम भाग ज्या ठिकाणी चीनचे सैनिक प्रतिकूल नैसर्गिक स्थितीमुळे प्रत्यक्ष थांबू शकत नाहीत, तेथे रोबोट सैनिक ठेवले आहेत. त्यांच्या माध्यमातून चीन युद्ध करू शकतो. याविषयी चीनचे संशोधन चालू आहे.
५. दळणवळण आणि अन्य क्षेत्रांसाठी उपयोग
आंतरराष्ट्रीय उद्योजक इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ आस्थापनाने मानवरहित चारचाकी गाड्या बाजारात आणल्या आहेत. विदेशात रस्ते सरळ आणि काटकोन या स्वरूपात अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी चालवण्यास त्या उत्तम आहेत.
‘एआय’चे पुढील अनेक प्रकारे उपयोग करण्यासाठी सध्या संशोधन चालू आहे.
५ अ. शेतीसाठी : शेतीविषयी ‘ड्रोन’ आणि ‘सेन्सर्स’ यांद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, पिकांची स्थिती आणि त्यांची वाढ कधी होणार ? यांचे अनुमान बांधण्यासाठी मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करणे आणि अचूक अंदाज वर्तवणे.
५ आ. आरोग्य क्षेत्रामध्ये उपयोग : एखाद्या आजाराचे लवकर निदान करणे, वैद्यकीय क्षेत्रात ज्या काही चाचण्या केल्या जातात, त्यांच्यामध्ये अचूकता आणणे, त्या माहितीचे विश्लेषण करून नेमक्या आजाराच्या स्थितीचा अंदाज बांधणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णाशी संबंधित ‘एक्स-रे’ (क्ष-किरण चाचणी), अन्य संगणकीय आलेख यांचे विश्लेषण करणे. आवश्यक तेथे संगणकीय प्रतिमा सिद्ध करून रुग्णाची स्थिती सांगणे.
५ इ. शिक्षणामध्ये उपयोग : केरळ येथे एका शाळेने ‘एआय’ शिक्षक सिद्ध केला असून तो मुलांना शिक्षकांसारखे शिकवू शकेल या दृष्टीने प्रयत्न करत आहे. आता महाराष्ट्रात अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षण मातृभाषेत, म्हणजे मराठीत शिकवण्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. या ठिकाणी शिक्षक इंग्रजीतून विषय शिकले असल्याने ते मुलांना इंग्रजीतून विषय शिकवणार आहेत, तर ‘एआय’द्वारे मुलांना त्यांच्या मातृभाषेत ते ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाषेची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
५ ई. संशोधन क्षेत्रात पुष्कळ लाभ : अनेक प्रकारच्या संशोधनामध्ये प्रयोगातील माहितीचे शोधप्रबंध सिद्ध करणे, माहितीची वर्गवारी करणे, प्रयोगांमध्ये प्राथमिक निष्कर्ष सांगणे. संशोधनाचे भविष्य आणि जटीलता सांगणे इत्यादी उपयोग होऊ शकतो.
५ उ. अन्य क्षेत्रांमध्ये उपयोग : कायदेशीर प्रक्रियेमध्ये कागदपत्रे सिद्ध करणे, माहितीच्या अनुक्रमणिका सिद्ध करणे इत्यादी होतो. ‘चॅट जीपीटी’ वा ‘जेमिनी’ प्रणालीवर एखादा विषय शोधला, तर अगदी त्या विषयावर मथळे, उपमथळे यांसह निबंधाप्रमाणे उत्तर मिळते, तेही संबंधित विषयाच्या लाभ, हानी या स्वरूपात, म्हणजे विश्लेषण करून उत्तर मिळत आहे. काही वेगळ्या लिखाणाची आवश्यकता भासत नाही. कुणी त्या माहितीवरून पुस्तकेही सिद्ध करून विकत आहे, कुणी माहितीचा विविधांगी उपयोग करत आहे.’
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१३.३.२०२४)
‘एआय’चे भविष्य आणि परिणाम‘सर्वसाधारण व्यक्ती वैयक्तिक स्वरूपात ‘एआय’ वापरून काही करणे, हे त्या व्यक्तीपुरते सीमित राहील; मात्र मोठ्या आस्थापनांनी यात उतरून प्रयोग करणे, मानवाला उपयुक्त आणि त्याच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त सुविधा, यंत्रे यांची निर्मिती करणे, वस्तूंची निर्मिती करणे यांवर खरे तर ‘एआय’चे भविष्य अवलंबून आहे. ‘एआय’च्या भविष्याचा वेध एका मर्यादेच्या पुढे घेता येत नाही; कारण माहिती क्षेत्रात ‘सर्च इंजिन’मध्ये गूगलचा दबदबा वाटत होता, त्याला पर्याय नाही, असे वाटत होते; मात्र आज ती शक्यता फोल ठरली आहे. तंत्रज्ञानाचा विकास होत असल्यामुळे त्या त्या काळात वरचढ तंत्रज्ञान उदयास येते. त्यामुळे सध्याच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा हा प्रवास कुठपर्यंत होणार ? हे केवळ काही प्रमाणात पाहू आणि अनुभवू शकतो. आता ‘एआय’मुळे वर्ष २०४० मध्ये एखाद्या शहराची परिस्थिती, भूभागाची परिस्थिती कशी असेल ? याचेही अनुमान बांधता येऊ शकते. त्यामुळे ‘एआय’ने काही प्रमाणात भविष्य सांगू शकतो; मात्र त्याचे स्वतःचे भविष्य काय असेल, याचा अनुमान आताच बांधणे शक्य होणार नाही. ‘एआय’ त्याला उपलब्ध केलेल्या माहितीचे (‘डेटा’चे) विश्लेषण करून उत्तरे देत असला, तरी त्याला योग्य माहिती पुरवणे शेवटी मनुष्याचे काम आहे. चुकीची माहिती दिली, तर अनर्थ होऊ शकतो. याविषयी मोठमोठ्या तंत्रज्ञानविषयक आस्थापन प्रमुखांचे आरोप-प्रत्यारोप होतात. गूगलच्या ‘जेमिनी’विषयी इलॉन मस्क यांनी ‘जेमिनी नागरीविरोधी आहे; कारण त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांच्या धोरणांवरून ते ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाह) आहेत’, असे उत्तर दिले होते. यातून हे तंत्रज्ञान कशा प्रकारे नियंत्रित करता येऊ शकते ? याचेही काही प्रमाणात अनुमान येते. तंत्रज्ञान सिद्ध करणार्या मानवाची बुद्धी सात्त्विक असली, तर तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी होईल, याची निश्चिती देता येते. ‘एआय’चा धोका या अर्थी, म्हणजे तंत्रज्ञान शिकून त्यातून कोण कुठले उत्पादन सिद्ध करील ? कशी माहिती मिळवेल ? यावर कुणाचे नियंत्रण असणार नाही. ‘एआय’चे अग्र्रणी जिओफ्रे हिंटन यांनी मागील वर्षीच ‘एआय’विषयी भाष्य करतांना ‘एआय मानवजातीला धोका ठरू शकेल’, असे भाकीत केले आहे. वास्तविक त्यांनी स्वत:चे अर्धे आयुष्य ‘एआय’ प्रणाली प्रत्यक्षात उपयोगात आणण्यासाठी खर्ची घातले आहे. त्यांनाच त्याविषयी भीती वाटत आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान आस्थापने, संघटना, शाळा-महाविद्यालये यांमध्ये तेथील आवश्यकतांच्या अनुसार कशा प्रकारे उपयोग करू शकतो ? याचा संबंधितांनी विचार करणे आवश्यक आहे. ‘सर्च इंजिन’ पुढे कालबाह्य होईल; मात्र ‘एआय’ तंत्रज्ञानाचा उपयोग न केल्यास आस्थापन, संघटना या इंटरनेट जगतातून कालबाह्य होण्याचा वा इतिहासजमा होण्याचा धोका आहे.’ – श्री. यज्ञेश सावंत (१३.३.२०२४) |