‘मी मरेन; पण चित्रपटातून ‘जय श्रीराम’ शब्द काढणार नाही’, असा निर्माते बोकाडिया यांचा पवित्रा !
मुंबई – ‘केंद्रीय चित्रपट परीनिक्षण मंडळ अर्थात् ‘सेन्सॉर बोर्डा’ने निर्माते-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया यांनी त्यांच्या आगामी ‘तिसरी बेगम’ या हिंदी चित्रपटातील ‘जय श्रीराम’ हे शब्द हटवण्यास सांगितले आहे.
बोकाडिया यांनी त्यांच्या ‘तिसरी बेगम’ या नवीन चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘सेन्सॉर बोर्डा’कडे अर्ज केला होता. चित्रपट पाहिल्यानंतर ‘सेन्सॉर बोर्डा’च्या परीक्षक समितीने त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास नकार दिला; कारण ‘या चित्रपटात समाजात प्रचलित असलेल्या सामान्य घटना एक परंपरा म्हणून दाखवण्यात आल्या असून त्यांमुळे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात वैमनस्य निर्माण होते’, असे ‘सेन्सॉर बोर्डा’ने म्हटले आहे. ‘सेन्सॉर बोर्डा’ने बोकाडिया यांना चित्रपट ‘रिव्हिजन कमिटी’कडे पाठण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर बोकाडिया यांनी चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी पुन्हा अर्ज केला. यानंतर ‘सेन्सॉर बोर्डा’ने के.सी. बोकाडिया यांना पत्र पाठवून ‘तिसरी बेगम’ हा चित्रपट ‘केवळ प्रौढांसाठी’ या प्रमाणपत्रासह प्रदर्शित करण्याच्या ‘रिव्हिजन कमिटी’कडून मिळालेल्या शिफारसीचा संदर्भ देऊन चित्रपटात १४ ठिकाणी पालट करण्यास सांगितले आहे. यामध्ये एका दृश्यातील ‘जय श्रीराम’ हे शब्द काढून टाकण्यास सांगितले आहे.
बोकाडिया यांच्याकडून सुंदरकांडाचा संदर्भ !
बोकाडिया यांनी १४ सूत्रांंपैकी ‘जय श्रीराम’ काढून टाकण्याच्या सूत्रावर त्यांचा सर्वांत मोठा आक्षेप असल्याचे म्हटले आहे. श्रीराम हे आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. जेव्हा आक्रमणकर्ता एखाद्या व्यक्तीला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर आक्रमण करत असेल, तेव्हा त्या व्यक्तीने ‘जय श्रीराम’चा आश्रय घेणे, हे अनुचित ठरू शकत नाही.
‘श्रीरामचरित मानस’च्या सुंदरकांडात विभीषण आश्रयाला आल्यावर भगवान श्रीरामाने म्हटलेल्या एका श्लोकाचे उदाहरण देत बोकाडिया म्हणाले, ‘जर एखादा हल्लेखोर एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याच्या उद्देशाने आलेला असेल आणि त्या वेळी शरण आलेली व्यक्ती प्रभु श्रीरामाचे नामस्मरण करत असेल, तर क्वचितच कुणी असेल, जो त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यापासून रोखेल. ‘तिसरी बेगम’ चित्रपटातील संबंधित दृश्यदेखील असेच आहे, ज्यात एक माणूस स्वत:ची ओळख लपवून तिसरे लग्न करतो आणि नंतर त्याची चूक मान्य करतो अन् भगवान श्रीरामाला त्याचा जीव वाचवण्याचे आवाहन करतो.
के.सी. बोकाडिया यांनी ‘सेन्सॉर बोर्डा’ने सूचवलेला पालट स्वीकारण्यास नकार दिला असून ‘सेन्सॉर बोर्डा’चे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याकडेही त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. ‘मी मरेन पण माझ्या चित्रपटातून ‘जय श्रीराम’ हे शब्द हटवणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘सेन्सॉर बोर्डा’ने माझा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही, तर त्याविरोधात मी उच्च न्यायालयात जाईन’, अशी चेतावणीही बोकाडिया यांनी दिली आहे.