Delhi High Court : कायदेशीर प्रकरणांतील मध्यस्तीसाठी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आधार घेतला जाऊ शकतो  !

  • देहली उच्च न्यायालयाचे निरीक्षण !

  • ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत प्रविष्ट (दाखल) गुन्ह्यांवर मात्र मध्यस्थी करणे अनुचित असल्याचे मत व्यक्त !

नवी देहली – कोणतेही कायदेशीर प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करता येते. यासाठी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला जाऊ शकतो. या ग्रंथांतील अध्याय तपशीलवार समजून घेतले पाहिजेत. त्यांच्याकडे केवळ एक ‘धार्मिक ग्रंथ’ म्हणून पहायला नको. यातून कायदेशीर प्रकरणेही मिटवली जाऊ शकतात, असे निरीक्षण देहली उच्च न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यावर पुढे म्हणाल्या की, मध्यस्थी केवळ ब्रिटीश किंवा इतर परदेशी न्यायशास्त्राच्या आधारे नव्हे, तर प्राचीन भारतीय न्यायिक अन् मध्यस्थी न्यायशास्त्राच्या आधारावर होऊ शकते. यांमध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता यांसारख्या प्राचीन धर्मग्रंथांचा समावेश करता येईल. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थीचा वापर कसा केला जातो ?, हे अधोरेखित करण्यासाठी न्यायालयाने कुराण, बायबल यांतील पंक्तींचाही संदर्भ दिला आहे.

न्यायमूर्ती पुढे म्हणाल्या की, असे असले, तरी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, म्हणजेच ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत खटल्यांची मध्यस्थी करता कामा नये. या गुन्ह्यांच्या संदर्भात तडजोड केली जाऊ शकत नाही.

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०१५ मध्ये एका व्यक्तीच्या पत्नीच्या नातेवाईकाने लहान मुलीचे लैंगिक शोषण केले होते. तक्रारदार व्यक्तीने, म्हणजेच पतीने आधी खालच्या न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावर खालच्या न्यायालयाने मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यास सांगितले होते. यावर तक्रारदाराने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.