वाईट काळ येत असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया लवकर करणे आवश्यक !
कु. सुप्रिया जठार : मी २ वर्षांपूर्वीही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप) करत होते आणि आताही करत आहे. मला वाटते, ‘मी २ वर्षांपूर्वी जी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केली, तेव्हा आध्यात्मिक त्रासामुळे मला त्याचे फारसे आकलन झाले नव्हते. आता ती प्रक्रिया करतांना सगळी आकलन होत आहे’, असे मला जाणवते.
(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्या पुढे ‘त्या चुका कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या ?’, ते लिहिणे आणि ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून त्या दिवसातून १० – १२ वेळा मनाला देणे)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : योग्य आहे. त्रासामुळेच तसे होते, म्हणजे आता त्रास न्यून झाले आहेत.
कु. सुप्रिया जठार : हो, त्रास पूर्वीपेक्षा पुष्कळ न्यून झाला आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग आता लवकर पुढे जाल.
कु. सुप्रिया जठार : परम पूज्य, आता माझ्या मनामध्ये असे विचार येतात, ‘मी जी काही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत आहे, ती जलद गतीने करायला हवी. माझे चित्त लवकरात लवकर शुद्ध व्हायला हवे.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगला विचार आहे. वाईट काळ लवकर येत आहे ना; म्हणून चित्त लवकर शुद्ध व्हायलाच पाहिजे. जो विचार आला, त्यावर स्वयंसूचनाही द्या.
कु. सुप्रिया जठार : म्हणजे स्वयंसूचना कशा संदर्भात द्यायची ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘आता चित्त लवकर शुद्ध व्हायला पाहिजे’, असे तुमच्या मनात येते ना, तर त्याला वाक्य जोडा, ‘आता वाईट काळ लवकर येत आहे; म्हणून मी चित्तशुद्धीचे प्रयत्न लवकर वाढवले पाहिजेत.’
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |