Pakistan Hindu Refugees : देहलीतील पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदूंची वस्ती हटवण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश !

नवी देहली – देहली विकास प्राधिकरणाने (डी.डी.ए.ने) राज्यातील ‘मजनू का टिला’ भागातील हिंदु निर्वासित शिबिर हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या १६० हिंदु कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्यातरी या सर्वांना रात्र निवारागृहात हालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय हरित लवादाच्या (एन्.जी.टी.च्या) आदेशानुसार डी.डी.ए.ला भूमी रिकामी करण्यास सांगितले आहे. पोलीस बंदोबस्त होताच कारवाई केली जाईल.

या संदर्भात हिंदु शरणार्थी शिबिराचे प्रमुख दयाल दास यांनी सांगितले की, या प्रकरणी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांची भेट घेतली होती. ‘निर्वासित हिंदूंना येथून हटवले जाणार नाही’, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. पाकिस्तानातून आलेल्या १६० हून अधिक कुटुंबांतील ७५० हून अधिक लोक येथे रहातात. येथे आमच्या मुलांच्या शाळा आहेत. आम्हाला येथून हटवले, तर मुलांचा अभ्यास कसा होणार ?

संपादकीय भूमिका

जर ही वस्ती अनधिकृत असेल, तर सरकारने या हिंदूंना अद्याप कायदेशीर घरे का दिली नाहीत ? पाकमध्ये हिंदूंना जे भोगावे लागते, ते भारतातही भोगावे लागत असेल, तर ते भारतीय हिंदूंना लज्जास्पद असेल !