पुणे – वडकीतील दिवे घाटाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक मस्तानी तलावाच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडून २ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. निधीअभावी दुरुस्तीची कामे अर्धवट स्थितीत पडली होती; परंतु आता पुरातत्व विभागानेच दुरुस्तीसाठी निधी दिल्याने या कामांना गती मिळाली आहे. तलावातील गाळ काढून खोली वाढवणे, संरक्षक भिंतींची डागडुजी, तसेच इतर अनेक कामे करण्यात येणार आहेत.
मस्तानी तलाव १४ एकर क्षेत्रामध्ये असून त्यामध्ये ४० फुटांहून अधिक पाणीसाठा रहातो. गेल्या २ वर्षांपासून पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने हा तलाव कोरडा पडत आहे. तलावाची चिरेबंदी संरक्षण भिंत ठिकठिकाणी ढासळली आहे. झाडेझुडपे, गवत वाढले आहे. डोंगरावरून पावसाच्या पाण्यासमवेत दगड, माती थेट तलावात येत असल्याने तलावाचे पात्र छोटे झाले आहे.