‘बारसू रिफायनरी बचाव समिती’ची मागणी
मुंबई – कोकणातील रिफायनरीला विरोध करणारे यांनी अडाणीपणा सोडा. गुजरातपासून काही धडा घ्या. गुजरातचा शेतकरी प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत नाही; कारण त्यांना माहीत आहे की, यातून रोजगार, नोकर्या प्राप्त होतात. कोकणातील घरातील प्रत्येक एक व्यक्ती नोकरीकरिता दुसर्या शहरात गेली आहे. कोकणामध्ये प्रचंड प्रमाणात बेकारी वाढल्यामुळे युवावर्ग कोकण सोडून जात आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. कोकणवासियांनी तोंडापर्यंत आलेला घास गिळून घ्यावा, यातच त्यांचे भले आहे. रिफायनरीला विरोध करणार्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारागृहात टाकणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘बारसु रिफायनरी बचाव समिती’चे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केले आहे.
अशिक्षित लोकच राजकारण्यांना बळी पडत आहेत. त्यांनी विकास आणि नोकर्या बघाव्यात. विरोध करून अंगावर गुन्हे घेऊ नयेत. हा प्रकल्प नाणारमधून बारसूमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनेच आणला. आता उबाठा गट या प्रकल्पाला राजकीय हेतूने विरोध करत आहे. राजकीय पक्षांनी कोकणातील १० सहस्र तरुणांना नोकर्या द्याव्यात, मगच या प्रकल्पाला विरोध करावा, असे ते पुढे म्हटले आहे.