साधकांनो, ‘द्वेष करणे’ या स्वभावदोषामुळे होणारे दुष्परिणाम जाणा आणि तो दूर करण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

‘द्वेष करणे’, हा स्वभावदोष कशामुळे निर्माण होतो ? त्याचे प्रकटीकरण कसे होते ? हा स्वभावदोष घालवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याचे चिंतन भगवंताने माझ्याकडून करून घेतले. ते पुढे दिले आहे.

श्री. अशोक लिमकर

१. द्वेषाचा दुष्परिणाम सांगणारी कथा

एकदा एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेत आणायला सांगितले. त्या मुलांनी ते ज्या व्यक्तींचा द्वेष करत असतील, त्यांचे नाव प्रत्येक टोमॅटोवर लिहून आणायचे होते. अशा प्रकारे ते जेवढ्या व्यक्तींचा द्वेष करत असतील, तेवढेच टोमॅटो त्यांनी आणायचे होते. ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी नावे लिहिलेले टोमॅटो आणले. काहींनी २, काहींनी ३, काहींनी ५, तर काहींनी २० टोमॅटो आणले. शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले, ‘‘आता पुढील २ आठवडे हे टोमॅटो तुम्ही ज्या ठिकाणी जाल, त्या सर्व ठिकाणी समवेत घेऊन जायचे आहेत.’’ जसजसे दिवस उलटू लागले, तसतसे मुले टोमॅटोंचे कुजणे आणि दुर्गंध यांविषयी गार्‍हाणे करू लागली. ज्या विद्यार्थ्यांकडे अधिक संख्येने टोमॅटो होते, त्यांनी गार्‍हाणे केले, ‘‘आमच्याकडचे ओझे अधिक असून पुष्कळ दुर्गंधही येत आहे.’’ एका आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना विचारले, ‘‘तुम्हाला या आठवड्यात कसे वाटले ?’’ मुलांनी घाणेरडा वास आणि टोमॅटोचे ओझे यांविषयी गार्‍हाणे केले. विशेषतः ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते, त्यांनी अधिक गार्‍हाणी केली.

शिक्षिका म्हणाली, ‘‘तुम्ही तुम्हाला न आवडणार्‍या व्यक्तींविषयी मनात द्वेष बाळगता ना ! त्याला हे तंतोतंत जुळत आहे. द्वेषामुळे अंतःकरण रोगट बनते. तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल, तिथे समवेत घेऊन जाता. जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल, तर कल्पना करा, तुम्ही प्रतिदिन सोबत ठेवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंतःकरणावर किती परिणाम होत असेल ! आपल्या दुःखाचे कारण हेच आहे की, नको त्या वाईट गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो. अंतःकरण ही एक सुंदर बाग आहे. तिची नियमित मशागत करण्याची आवश्यकता असते. ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, त्यांना क्षमा करा. त्यामुळे तुमच्या अंतःकरणात नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी जागा होईल. कटूता नव्हे, तर काहीतरी चांगले मिळवण्यासाठी आपण सर्व जण चांगल्या व्यक्तींच्या समवेत चांगल्या विषयांसाठी एकत्रित काम करूया.’’

२. द्वेष कसा निर्माण होतो ?

अ. कुणी प्रशंसा केली, तर मनाला चांगले वाटते आणि निंदा केली, तर मनात द्वेष निर्माण होतो.

आ. ‘द्वेष’ हा रागाचा सहचारी आहे, म्हणजे जेथे राग आहे, तेथे द्वेष असतोच. सुखप्राप्तीमध्ये येणार्‍या अडथळ्यांमुळे राग येतो. राग येण्याला कारण असलेल्या व्यक्ती आणि वस्तू यांच्याप्रती द्वेष निर्माण होतो.

इ. अनाठायी, अनावश्यक आणि अयोग्य अपेक्षा मनात असल्या, तर द्वेष निर्माण होतो.

ई. एखाद्या व्यक्तीविषयी मनात ‘पूर्वग्रह’ असेल, तर त्याच्या साहाय्याला त्याचा भाऊ असलेला द्वेष धावून येतो.

उ. एखाद्याविषयी मनात मत्सराची भावना असेल, तर त्या मत्सराचे प्रकटीकरण द्वेषाच्या रूपात होते. समजा, एखाद्या व्यक्तीकडे पुष्कळ गोष्टी आहेत आणि त्या दुसर्‍या व्यक्तीकडे नाहीत, तेव्हा त्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात पहिल्या व्यक्तीविषयी द्वेषभावना निर्माण होऊ शकते, उदा. दुसर्‍या व्यक्तीमध्ये ‘स्थावर-जंगम मालमत्ता, सुदृढ शरीरयष्टी, निर्मळ मन, प्रेमभाव, मनमोकळा स्वभाव, कष्टाळू वृत्ती’ इत्यादी गुणांपैकी एक किंवा अधिक गुणांचा अभाव असेल, तर तिच्या मनात पहिल्या व्यक्तीविषयी द्वेषभावना निर्माण होऊ शकते.

३. द्वेषाचे प्रकटीकरण कसे होते ?

एखाद्याच्या वागण्या-बोलण्यातून द्वेषाचे प्रकटीकरण होते.  ‘एखाद्याविषयी नकारात्मक विचार प्रकट करणे, त्याचे गुण आणि क्षमता यांविषयी शंका प्रकट करणे, सकारात्मक बोलण्याचे टाळणे, दुसर्‍याकडे त्याची निंदा-नालस्ती करणे, त्याच्यासंबंधी अयोग्य कृती करणे’ इत्यादींमधून त्या व्यक्तीविषयी द्वेषभावना प्रकट होऊ शकते.

४. द्वेषाचे दुष्परिणाम

श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतो,

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३४

अर्थ : प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग आणि द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये; कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत.

अ. द्वेषामुळे अंतर्मनात अयोग्य संस्कारांची वाढ होत रहाते. ती व्यक्ती स्वभावदोषांच्या गर्तेत गुंतत जाते. त्यामुळे तिच्या साधनेची हानी होते.

आ. द्वेषामुळे त्या व्यक्तीचे मन कलुषित झालेले असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातून इतरांची मनेही कलुषित करण्याचे पाप घडते.

इ. द्वेषामुळे इतरांनाही साधनेपासून परावृत्त करण्याचे पाप हातून घडते. एखाद्या व्यक्तीतील चांगला गुण पाहून दुसरी व्यक्ती तो गुण स्वतःत आणण्यासाठी प्रयत्न करू लागली, तर तिसरी व्यक्ती त्या गुणी व्यक्तीविषयीच्या द्वेषभावनेने तिचे अवगुण दुसर्‍या व्यक्तीला सांगू लागते, म्हणजेच त्या व्यक्तीची दुसर्‍या व्यक्तीकडे निंदा-नालस्ती केली जाते. तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातील त्या व्यक्तीविषयीचा आदरभाव न्यून होतो. त्यामुळे स्वतःकडून आणि इतरांकडून होणार्‍या साधनेच्या चांगल्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होतात. दोघांचीही अधोगतीकडे वाटचाल चालू होते.

ई. द्वेष करणार्‍या व्यक्तीच्या मनात अनेक भावभावना आणि अयोग्य विचार यांचा कल्लोळ माजलेला असतो. तिचे ‘काय योग्य आणि काय अयोग्य ?’, याविषयीचे भान सुटलेले असते. ती व्यक्ती इतरांशी अयोग्य वागू आणि बोलू लागते. त्यामुळे तिचे कुटुंबीय आणि अन्य व्यक्ती यांच्या मनामध्ये असलेली त्या व्यक्तीविषयीची आदरभावना, प्रेमभाव अन् आपुलकी न्यून होते. त्यांचे त्या व्यक्तीशी असलेले संबंध बिघडतात आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

उ. द्वेष करणार्‍या व्यक्तीच्या मनातील त्यागाची भावना नष्ट होते. तिच्याकडून इतरांचा विचार होत नाही.

ऊ. द्वेषामुळे ‘समोरच्या व्यक्तीमध्ये आणि स्वतःमध्येही भगवंताचा अंश आहे’, याचा त्या व्यक्तीला विसर पडतो. द्वेष करणारी व्यक्ती ‘आपण भगवंताचाच द्वेष करत आहोत’, हे विसरते आणि ती देवापासून दूर जाते.

ए. द्वेषामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमध्ये वाढ होते. ते दूर करण्यासाठी मूळ कारणांचा शोध न घेता वरवरचे उपाय केल्यास त्रासांचे प्रमाण न्यून न होता वाढतच जाते.

५. साधनेमुळे ‘द्वेष’ हा स्वभावदोष उणावणे

अ. ‘द्वेष’ हा स्वभावदोष सर्वांमध्ये अल्प-अधिक प्रमाणात असतो. जसजशी साधनेत प्रगती होऊन उन्नत अवस्था किंवा संतपद प्राप्त होते, तसतसे द्वेषाचे प्रमाण घटत जाऊन शेवटी शून्य होते. ज्या प्रमाणात आसक्ती न्यून होत जाते, त्या प्रमाणात द्वेषही न्यून होत जातो.

आ. ज्ञानी माणसांमध्ये आसक्ती नसल्यामुळे त्यांच्यात द्वेष नसतो.

इ. जो इंद्रियांना जिंकतो आणि इंद्रियांना अधीन ठेवतो, तो सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेला असतो. राग आणि द्वेष त्याच्या वार्‍यालाही उभे रहात नाहीत.

६. ‘द्वेष’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी करायचे प्रयत्न

अ. ‘द्वेष कशामुळे निर्माण झाला ?’, हे प्रथम शोधावे, उदा. आपल्याला एका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळण्याऐवजी दुसरा क्रमांक मिळाला. त्या वेळी प्रथम क्रमांक मिळालेल्या खेळाडूविषयी मनात निर्माण होणारी द्वेषभावना दूर करण्यासाठी मनाला वेगवेगळे दृष्टीकोन देऊन ती द्वेषभावना मनातून मुळापासून उखडून टाकावी. ‘खेळामध्ये कुणाची तरी हार-जीत होत असतेच’, हे मनमोकळेपणाने आणि हसत-खेळत स्वीकारता आले पाहिजे. प्रथम क्रमांक पटकावणार्‍या खेळाडूचे अभिनंदन करून मनाचा मोठेपणा दाखवला, तर द्वेषाचा विचार आपल्या मनात येणार नाही. ‘आता प्रथम क्रमांक आला नाही’, हे स्वीकारणे आणि ‘पुढच्या स्पर्धेसाठी चांगले प्रयत्न करून प्रथम क्रमांक मिळवीन’, असा सकारात्मक विचार करून मनाला समजावणे’, असे प्रयत्न केल्यास मनात द्वेषभावनेला जागा रहाणार नाही.

आ. ‘द्वेष हा स्वभावदोष दूर केल्याविना माझ्या साधनेची वाटचाल देवाच्या दिशेने होणार नाही. द्वेषामुळे माझे दैनंदिन जीवन बिघडणार आहे. ‘योग्य काय ? अयोग्य काय ?’, याविषयी माझ्या मनाचा गोंधळ होऊन माझ्याकडून अयोग्य वागणे आणि बोलणे होणार. त्याचा परिणाम म्हणून मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासाला सामोरे जावे लागणार’, याची जाणीव मनाला करून द्यावी. तशी स्वयंसूचना बनवून सत्रे करावीत.

इ. व्यक्तीने सतत सत्संगात रहावे.

७. ‘द्वेष’ हा स्वभावदोष दूर झाल्यावर होणारे लाभ

अ. द्वेषाचा विचार मनातून दूर झाल्यावर योग्य वागणे आणि बोलणे होते.

आ. मन मोकळे होऊन आनंद वाटतो.

इ. द्वेषाचा विचार मनातून दूर केल्यामुळे इतर स्वभावदोषांच्या विचारांनाही मनात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मन निर्मळ रहाते. ‘निर्मळ मनातच भगवंताचा वास असतो’, हा विचार वाढतो आणि भगवंताच्या अनुसंधानात वाढ होते.

ई. हातून पापाचरण घडत नाही. योग्य कृती होऊन संचितानुसार वाट्यास आलेले प्रारब्ध भोगून तो जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.

उ. ‘माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये भगवंताचा वास आहे अन् भगवंत सर्वांना साधनेच्या प्रयत्नांमध्ये साहाय्य करून पुढे पुढे जाण्यास कृतीशील करत आहे’, याचा अनुभव येतो.

ऊ. प्रेमभाव आणि अन्य गुणांची वाढ होऊन कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते. एकमेकांविषयी आपुलकी, आदर आणि त्यागाची भावना वाढते. इतरांचा विचार करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होते.

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘देवाने माझ्याकडून हे चिंतन करून घेतले, मला वेगवेगळी सूत्रे सुचवली आणि ती माझ्याकडून लिहून घेतली’, याबद्दल भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

‘सर्व साधकांमधील ‘द्वेष’ या स्वभावदोषाचे उच्चाटन होऊन त्याची जागा ‘निरपेक्ष प्रीती, त्याग आणि सर्वांमध्ये भगवंताला पहाण्याची वृत्ती’, या गुणांनी घ्यावी’, अशी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो अन् हे सर्व लिखाण मी त्यांच्याच चरणी अर्पण करतो.’

– श्री. अशोक लिमकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.