देशातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होत असल्याचा दावा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये फेसबुक, एक्स, यू ट्यूब, इन्स्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यासाठी तेथील संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सत्ताधार्यांपैकी एक पक्ष असलेल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे खासदार बहरामंद तांगी यांनीच हा प्रस्ताव मांडला आहे. ‘सामाजिक माध्यमांच्या नकारात्मक प्रभावापासून तरुण पिढीचे रक्षण करण्यासाठी त्यावर बंदी घालण्यात यावी,’ असे या प्रस्तावात म्हटले आहे. यानुसार ‘सामाजिक माध्यमांतून देशातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. त्याचा वापर आपल्या धर्म आणि संस्कृती यांविरोधात केला जात आहे. त्यामुळे भाषा आणि धर्म यांच्या आधारावर लोकांमध्ये द्वेष वाढत आहे’, असे सांगण्यात आले आहे.
या प्रस्तावावर चर्चा होणार आहे; परंतु तंगी यांच्या या प्रस्तावापासून ‘पीपीपी’ने स्वत:ला दूर ठेवले आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे पीपीपीने नुकतीच टांगी यांची पक्षातून हकालपट्टी केली.
सौजन्य:R.Digital
इम्रान खान यांच्या पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचाही दावा !
या प्रस्तावाकडे काहीजण निवडणुकांच्या दृष्टीकोनातूनही पहात आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ने (‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ने) त्याचा प्रचार सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात केला होता. यातून सुरक्षादलांच्या विरोधातही अपप्रचार केला गेला, असे सांगण्यात आले. बनावट बातम्या प्रसारित करून देशात बनावट नेतृत्वाचा प्रचार केला गेला, असाही समज प्रसृत केला जात आहे. एकूणच सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्याचा प्रयत्न इम्रान खान यांच्या पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणूनही या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे.